कोकणातील तरंग संप्रदायामध्ये रवळनाथाच्या तरंगाला विशेष महत्त्व असून त्याला ‘मेळेकरी’ म्हटले जाते. खांबकाठीवर भरजरी वस्त्र लावून त्यावर रवळनाथाचे प्रतीक म्हणून चांदीचा वरदहस्त लावलेला असतो. ही कोकणातील प्रशासक देवता असल्याने तिला ‘राजसत्तेचे स्थळ’ म्हटलेले आहे.
अनुराधा परब
शिवगण म्हणून प्रसिद्ध असलेल्या रवळनाथ या देवतेचे कोकणातील सिंधुदुर्गामध्ये मोठे प्रस्थ आहे. रवळनाथाचा उल्लेख मार्मिक साहित्यात शिवगणांपैकी एक असा होत असला तरी हा शब्द उच्चारताच नाथ शब्दामुळे या देवतेचा संबंध नाथसंप्रदायाशी आहे का, याचा शोध घेण्यास आपल्याला प्रवृत्त करतो. उत्पत्तीशास्त्रानुसार रवळनाथाचा शोध घेत असताना त्याच्या सर्वप्रथम सांगितल्या जाणाऱ्या रूरूभैरवाच्या उत्पत्तीकडे दिशादर्शन होते. रूरूभैरव हा शिवाच्या अष्टभैरवांपैकी महत्त्वाचा मानला जाणारा भैरव आहे. याचा संबंध प्रामुख्याने रूद्राशी, रौद्ररूपाशी जोडला जातो. संशोधक म्हणून दैवतशास्त्राच्या अंगाने आपण कोणत्याही देवतेचा विचार करताना प्रतिमाशास्त्रावरूनच देवतांची ओळख पटविली जाते. किंबहुना, सर्वसामान्य भक्तांच्या मनात देवता कोण, याविषयी संभ्रम निर्माण होऊ नये म्हणूनच प्राथमिक प्रतिमाशास्त्राचा उदय झाला. सौंदर्यशास्त्र हे त्याचे विकसित रूप मानायला हवे. मात्र देवतेचे रूप ओळखणे ही त्याची प्राथमिक गरज आहे.
या अंगाने रवळनाथाच्या रूपाकडे बारकाईने पाहताना सर्वप्रथम लक्ष जाते ते रवळनाथाच्या चेहऱ्याकडे, नंतर त्याच्या उभ्या राहण्याच्या पद्धतीकडे. सिंधुदुर्गामध्ये प्राबल्य असलेल्या वेतोबा किंवा वेताळ, काळभैरव आणि रवळनाथ या सर्व देवतांमध्ये वेतोबा हा तुलनेने करुणामयी अवतार असल्याचे लक्षात येते. सर्वत्र उपलब्ध असलेल्या वेतोबाच्या मूर्तींचा चेहरा, त्याचे डोळे हे तो शिवगण असला तरीही रौद्र न भासता करुणामयी असल्याचे आधिक्याने लक्षात येते. रवळनाथाच्या बाबतीत मात्र तसे नाही. रवळनाथाचा चेहरा हा करारी आहे. देहबोलीत योद्ध्याचा आवेश आहे. कदाचित म्हणूनच त्याच्या चतुर्भुज हातांपैकी त्याच्या उजवीकडे तलवार तर डावीकडे त्रिशूळ प्रामुख्याने नजरेत भरतात. ही दोन्ही कालरूद्राची प्रतीके, तर त्याच्या इतर दोन हातांमध्ये डमरू, तर भिक्षापात्र दिसते. या भिक्षापात्राची आजवरच्या अभ्यासकांनी दोन प्रकारे वर्गवारी केलेली आहे. रवळनाथाच्या काही प्रतिमांमध्ये त्याच्या गळ्यात रूंडमाळा दिसतात. असुरांवरील विजयानंतर रूंडमाळा धारण करणाऱ्या रवळनाथाच्या हातातील पात्रामध्ये रक्त असल्याने त्याचे नाते शिवरूद्राशी आहे, असे अभ्यासकांच्या एका गटाचे मत आहे. तर दुसऱ्या अभ्यासकांच्या गटाच्या मतानुसार काही प्रतिमांमध्ये तो जानवे धारण करीत असल्यामुळे हाती असलेले ते भिक्षापात्र आहे.
कोकणातील प्रथा-परंपरांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, रवळनाथाचे शिवगणाशी असलेले नाते हे अधिक गडद असून रूंडमाळांकित रवळनाथ हेच त्याचे मूळ रूप असावे. कारण शिवगण रौद्ररूपातच पाहायला मिळतात. शिवगणांचे प्रतिमाशास्त्ररौद्ररूप व्यक्त करणारेच आहे. मूळ देवता आणि देवतांचे प्रतिमाशास्त्रही अनेकविध कारणांनी, प्रभावांनी बदलत गेल्याचे प्रसंगी अभ्यासातून लक्षात येते. त्यामुळे रवळनाथाच्या काही प्रतिमांमध्ये जानवेही पाहायला मिळते. रवळनाथाच्या प्रतिमेचे सुसंस्कृतीकरण करण्याचा प्रयत्न यातून झालेला दिसतो. असे बदल कालौघात होत असतात. याचा उलगडा करून त्याचे अर्थनिर्णयन करणे हे संशोधकांचे काम असते. याच दृष्टीने या देवतेच्या बदलत गेलेल्या वस्त्रांचाही विचार करता येऊ शकतो. अलीकडे मंदिरांच्या जीर्णोद्धारादरम्यान जुन्यांच्या जागी नव्याने मूर्ती घडवून त्यांची प्रतिष्ठापना केली जाते आणि जुनी मूर्ती विसर्जित केली जाते. प्रत्यक्षात अशा मूर्तींचे विसर्जन न करता त्यांचे जतन केले, तर संशोधकांसाठी हा अनमोल असा ठेवाच ठरेल.
ब्रह्मांड पुराण, पद्मपुराण तसेच केदारविजय या ग्रंथांमधून रवळनाथाच्या जन्मकथा येतात. पौगंड ऋषी आणि त्यांची पत्नी विमलाम्बुजा यांनी पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या प्रदोष व्रताचे फळ म्हणून अयोनीसंभवातून जे बालक उत्पन्न झाले ते जोतिबा, केदारनाथ होय. या केदारनाथाने जमदग्नी ऋषींच्या क्रोधाग्निचा तिसरा अंश धारण केल्यामुळे त्याचे नाव ‘रवळनाथ’ असे झाले. याच क्रोधाला “रवाग्नी” असाही शब्द आढळतो. रवाग्नीचा अवतार म्हणून ‘रवळनाथ’ अशीही एक उत्पत्ती सांगितली जाते. या रवळनाथाने विंध्यपर्वत ओलांडून आपल्या अधिपत्याखालील सैन्याच्या साह्याने राक्षसांचा वध करून दक्षिणेत प्रवेश केला. करवीर महात्म्यामध्ये महालक्ष्मीच्या निमंत्रणावरून कोल्हासुराचा निःपात करण्यासाठी रवळनाथ दक्षिणेत आल्याचे वर्णन आढळते. दक्षिण देशामध्ये दक्षिणेश्वर जोतिबाराय, केदार रवळेश या नावाने प्रसिद्ध आहे. रवळनाथाविषयी वेगवेगळे तर्क मांडण्यात आलेले आहेत. गोमांतक संशोधक
कै. शणैगोय बाब यांनी आपल्या कोंकणी पुस्तकात रवळनाथ ही देवता वेदपूर्वकालीन दैवत असल्याचे मत नोंदविले आहे. काही संशोधकांच्या मते नाथ संप्रदायाशी रवळनाथाचा निकटचा संबंध आहे. रेवन किंवा रेवणनाथ यांच्याशी रवळनाथाचा संबंध जोडला जातो. गोमांतकात रवळनाथ या शब्दातील ‘रव / रोव’चा अर्थ ‘सूक्ष्म कण’ असून त्या मातीच्या सूक्ष्म कणांपासून तयार झालेले ‘रवण / रोयण’ म्हणजे ‘रवळ – वारूळ’; त्या वारुळाचा नाथ म्हणजे ‘रवळनाथ’ असा अन्वय लावला जातो. गोव्यात वारुळाला ‘सांतेर’ म्हटले जाते. वारुळाला भूमीच्या योनीचे प्रतीक म्हटले आहे. वारुळरूपी क्षेत्रदेवता सांतेरी आणि त्या क्षेत्रात वस्ती करणारा, तिचे रक्षण करणारा नाग हे पुरुष व प्रकृतीचे निदर्शक आहेत. नागरूपी पुरुषतत्त्व हे क्षेत्रपाळ प्रतिनिधी मानले गेले आहे. यांच्यात “क्षेत्र – क्षेत्रपाळ”संबंध आहे. शिवाच्या अष्टभैरवांपैकी रूरूभैरवाच्या नावातील ‘रूरू’चे ‘रवळू’ आणि पुढे यथावकाश त्यामागे ‘नाथ’ शब्द जोडून ‘रवळनाथ’ असे रूपांतर झाले असण्याची शक्यता पं. महादेव शास्त्री यांनी व्यक्त केली आहे, तर ग. ह. खरे यांनी मूर्तीवरून रवळनाथ आणि खंडोबाचे एकरूपत्व सांगितले आहे. रवळनाथाला कोकणात आणणाऱ्या वसाहतकाराची जमात आपल्या गुणाने, पराक्रमाने इथे अग्रगण्य झाली असावी. त्यामुळे त्यांची ही देवतासुद्धा लोकप्रिय ठरून तिला कोकणातल्या देवस्कीमध्ये प्रधानता मिळाल्याचे निरीक्षण पु. रा. बेहेरे नोंदवतात. कोकणातील तरंग संप्रदायामध्ये रवळनाथाच्या तरंगाला विशेष महत्त्व असून त्याला ‘मेळेकरी’ म्हटले जाते. खांबकाठीवर भरजरी वस्त्र लावून त्यावर रवळनाथाचे प्रतीक म्हणून चांदीचा वरदहस्त लावलेला असतो. ही कोकणातील प्रशासक देवता असल्याने तिला ‘राजसत्तेचे स्थळ’ म्हटलेले आहे.
याचबरोबर मनोविकार बरे करणारा, सर्पविष उतरविणारा अशी गुणवैशिष्ट्येही या देवतेची सांगितली जातात. रवळनाथाच्या उभ्या प्रतिमेमध्ये त्याचा डावा पाय हा काहीसा वाकलेला किंवा जमिनीपासून वर उचललेला दाखवला जातो. यातून गतीचे सूचन तसेच त्याच्या देहबोलीतून युद्धसज्जता, लढाऊपणा आणि वीरता यांचे संमिश्र रूप हे सुरक्षेची आश्वासकता देणारे ठरते, असे मतही अभ्यासकांनी नोंदवले आहे.
थोडक्यात, रवळनाथाचे शिवरुद्र वा रूरू अष्टभैरवांशी असलेले नाते सर्वच अभ्यासकांनी मान्य केलेले दिसते. गुणवैशिष्ट्ययुक्त अशी ही देवता कोकणातील अनेकांची कुलदेवता आहे!