माधवी घारपुरे
‘सारखीच काय गं तुझी कुरकुर असते सुखदा! कधीही बिचारी आनंदी चेहऱ्याने भेटत नाही. सर्वात धाकट्या वन्सबाईंचं बाळंतपण झालं आता कसल्या जबाबदारीचे दु:ख?’ नीलिमा नेहमीप्रमाणेच सुखदाशी संवाद साधत होती.
‘तू हस मला. तुझा आणि माझा स्वभाव म्हणजे दोन टोकं. पण आपली घट्ट मैत्री परमेश्वरानं कशी काय जोडली, कोण जाणे? तुझ्याशिवाय कुणाशी मनातलं बोलू पण शकत नाही. अगं बाबांचं हार्टचं ऑपरेशन व्यवस्थित झालं, त्यांची तब्येत चांगली आहे म्हणून जरा सुस्कारा टाकते तोवर यांची बातमी येऊन धडकली’
‘काय झालं श्रीरंगला?’
‘झालं काही नाही गं! कंपनीत यांना कंपल्सरी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्यायला सांगितली आहे. केवढी समस्या!’
‘सुखदा अजून सहा महिने अवकाश आहे ना! शिवाय पाच वर्षांचा पगार, फंड वगैरे देणार आहेत. श्रीरंगला लाखाच्या वर पगार आहे आणि उद्याच दु:ख ओढवून आजचं सुख का घालवतेस? वेडी कुठली!’
‘चार दिवस सरळ मी सुखात काढू शकत नाही. तू मात्र बघावं तेव्हा आनंदात हसत असतेस. कोणत्या सुखी माणसाचा सदरा घालतेस गं! मला तरी आणून दे. वाट्टेल ती रक्कम मोजेन.’
नीलम म्हणाली, ‘हा सदरा विकत मिळत नाही. ज्याच्या त्याच्या मनात असतो तो’
‘तुला नेमकं काय म्हणायचं आहे? नीलम!’
‘सुखदा, कुणाच्या पायाखाली सतत हिरवळ असते गं! मध्ये मध्ये काटे टोचणारचं. सुखी माणसाचा सदरा म्हणजे तुझा स्वभाव वाइटातून चांगलं शोधायला शीक जरा.’
‘नुसता ५ वर्षांच्या पगाराची गंगाजळी किती दिवस पुरणार?’
‘अगं, श्रीरंगला स्वत:चा बिझनेस सुरू करायचा होता. आता त्याच्या हाती भांडवल येईल. तो गप्प बसण्यातला नाही. उद्या धंदा वाढला की कुठं पोचशील? सकारात्मक राहा जरा.’
वाइटानंतर चांगलं घडत आपलं फक्त लक्ष नसतं.
मंजूचा टॉयफॉइड दोनदा उलटला. मी काय स्थितीत होते विचार कर जरा. पैसा गेला. मानसिक स्वास्थ्य तर कुणालाच नव्हतं. पण ज्या डॉक्टरांनी मंजूला मागणीही घातली. आलं की नाही सुख!
‘तूच असा विचार करू शकतेस. मधले तुझ्या कष्टाचं काय?’
‘कष्ट कुणाला चुकलेत? जांभूळ ओठावर ठेवलं तर ढकलेल का? म्हणून वाट बघणारी तू! माझ्या बाबांनी लहानपणी माझ्याकडून काही जीवनोपयोगी सुभाषित पाठ करून घेतली होती त्यातलं एक
माझा गुरू झालाय.’
‘सुखास्यानंतर दु:खम् दुखस्थानंतरम सुखम्।
चक्रवत परिवर्तन्ते सुखानिच दु:खानिच।।’
पुलंनी जे सांगितलं तेच! चालताना पुढच्या पावलाला मी पुढं आहे याचा गर्व नसतो आणि मागच्याला आपण मागे आहोत याचं दु:ख नसतं. कारण त्यांना माहीत असतं की, क्षणाक्षणाला आपली स्थिती बदलणार आहे. सुख-दु:ख एकमेकाला सोडून जीवनात राहतच नाहीत. आपण पुष्कळ म्हणू की, या दोघांना बाजूला करू पण आजतागायत कुणीही असो राजा वा रंक त्यांना दूर करू शकत नाहीत. सुख-दु:ख नावं दोन असतील. पण ते एकच आहेत. प्रत्येक माणसाला आपापलीच सावली असते. पण इथं सुखाला सावली दु:खाची आणि दु:खाला सावली सुखाची अशी भानगड आहे. अगं या दोघांची मैत्री कधीच कशी कुणाच्या नजरेत येत नाही? तुला सांगू सुखदा ते दोघं आपापसात काय बोलत असतील ते!
सुखमित्र दु:खमित्राला म्हणत असेल, ‘मित्रा मला सोडून कधी जाऊ नको हं! तू आहेस म्हणून माझं कौतुक लोकं करतात. ऊन आहे म्हणून सावलीला विचारतात ना, तस्सच माझं आहे बघ! तर दु:खमित्र म्हणत असेल, तुला सोडणं शक्यच नाही. मी आलो की, लोकांची तोंड वाकडी होतात, पण माझ्यापाठी आज ना उद्या तू येशील या आशेने मला सांभाळतात रे!’
असं म्हणून सुख:दु:ख या दोन मित्रांनी प्रेमानं इतकी घट्ट मिठी मारली की, आजतागायत देवालाही ती सोडवता आली नाही. देवही त्यातच अडकले.
सुखदा अवाक् होऊन नीलमकडे बघतच राहिली. तिला नीलमचे म्हणणे पटले. तिने नीलमला इतकी घट्ट मिठी मारली की, सुख-दु:खाला देखील ती सोडवता आली नाही.