‘श्री गुरवे नमः’! भारतात गुरू-शिष्य नात्याला खूप महत्त्व आहे. आजही अनेक गुरू-शिष्याच्या जोड्या प्रेरणा देतात.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील अनोखी गुरू-शिष्याची जोडी : ऋषितुल्य विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. ग. श्री. अण्णासाहेब खैर. यांची आठवण…
मृणालिनी कुलकर्णी
‘विद्वान सर्वत्र पूज्यते’! या संस्थेच्या बोध वाक्यानुसार; परिस्थितीमुळे कोणीही शिक्षणाला वंचित राहू नये, यासाठी समाजातील दानाचा विनियोग गरजू होतकरू विद्यार्थ्यांना, शिक्षण, राहण्या-खाण्यासाठी व्हावा, या उद्दिष्टाने उभी केलेली शिक्षणसंस्था “पुणे विद्यार्थी गृह” (पीव्हीजी).
या संस्थेची मूळ कल्पना सामाजिक कार्यकर्ते, अभियंता दिवाण बहादूर का. रा. गोडबोले यांची.
ते लिहितात, “पुण्यात दाते खूप आहेत. दान घेणारा धडधाकट असून आळशी होत आहे. दानधर्माची दिशा बदला. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्या.” या लेखामुळे पाच नामांकित व्यक्तींनी पाच गरजू मुलांची शिक्षणासहित राहण्याची जबाबदारी स्वीकारली.
त्यानंतर दीड वर्षांनी १२ मे १९०९ रोजी “पुणे अनाथ विद्यार्थीगृहाची” स्थापना झाली. त्याचे पहिले कुलगुरू दादासाहेब केतकर होय. माधुकरी मागून, कष्टाची कामे करून, स्वावलंबनाने जगणाऱ्या, धडपडणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी पाठीशी उभे राहणे, ही भूमिका पीव्हीजी संस्थेने स्वीकारली.
दादासाहेबांचा स्वच्छ पेहेराव, पाणीदार डोळे, कामात प्रामाणिक, कुठेही तडजोड नाही. पैशाचा व्यवहार पारदर्शक, तनमनाने दादासाहेब विद्यार्थीगृहाशी एकरूप झाले. मुलांना पितृछत्र नि वहिनीची माया मिळाली. सतत प्रयोगशील राहणं आणि प्रगती साधणं ही दादासाहेबांनी वृत्ती. सुरुवातीला विद्यार्थ्यांचे राहणे, वाचनालय, व्यवसाय शिक्षण, शारीरिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी होते. मुलांची धावपळ होत होती. विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी दादासाहेब खूप वणवण करीत. दादासाहेबांचा लोकसंग्रह मोठा.
दादासाहेब प्रकृती स्वास्थासाठी डॉक्टरांच्या आग्रहानुसार नाशिकला गेले असता तेथे दानावर पोट भरणाऱ्या भोंदू भिक्षुकांचे/भिकाऱ्यांचे तांडे पाहताच दानाची दिशा बदलून नाशिक येथे संस्थेची शाखा व छापखाना काढला. विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी महाविद्यालय; राष्ट्रीय शिक्षण (माझा देश, माझा धर्म, माझी भाषा) देण्यासाठी महाराष्ट्र विद्यालय काढले. दानशुरांकडून प्रशस्त जागा मिळताच मोठे ‘विद्याभवन’ उभे केले. संस्थेची सारी दालने एकत्र आली. पुणे विद्यार्थीगृहाला प्रतिष्ठा प्राप्त झाली.
विसाव्या शतकाच्या पहाटे, पारतंत्र्याच्या काळात मोठ्या भावासोबत विष्णू शिक्षणासाठी पुण्याला आले. लोकांच्या मनात इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष, स्वदेशीची चळवळ, राष्ट्रीय शिक्षणाला पर्याय नाही, या टिळकांच्या वारंवार भाषणांनी विष्णूने भारावून जाऊन, मॅट्रिकच्या वर्गात असताना शाळा सोडली. मला देशसेवा करायची आहे, या दृढनिश्चयाने दादासाहेब खापर्डेच्या सांगण्यानुसार बाबा परांजपेंच्या यवतमाळच्या शाळेत नोकरीला रुजू झाले. एकेदिवशी धान्य संपल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांसाठी माधुकरी मागायला सुरुवात केली. नंतर त्या कामालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली. येथेच वयाच्या १९व्या वर्षी विष्णूचे दादासाहेब झाले. सरकारी छळामुळे ती शाळा बंद केली. राष्ट्रमत दैनिकात नोकरी करून नंतरची पीव्हीजी संस्था त्यांचे जन्माचे कार्यक्षेत्र बनले. संस्थेतील मुलांना स्वाभिमानानं जगायला शिकवलं. ‘सर्वांसाठी शिक्षण’ हे संस्थेचे ध्येय जोपासले. ते उतुंग व्यक्तिमत्त्व कुलगुरू दादासाहेब केतकर.
“शिक्षण सोडू नको, शिकलास तरच परिस्थिती सुधारेल” हे जाणणाऱ्या आईने, अठरा विश्वे दारिद्र्यामुळे आपल्या मुलाला गजाननाला (अण्णा) दादासाहेबांकडे सोपवून प्राण सोडले. गजाननाचे वय १५ वर्षं आणि संस्थेचे वय ४ वर्षे. घरचे अन्न/कपडे काहीच माहीत नसलेल्या उपासमार/कष्टाची सवय असलेल्या गजाननाला संस्थेत महत्त्वाकांक्षी मित्र भेटले. अण्णा म्हणजे दादासाहेबांचे स्वच्छ प्रतिबिंब! अण्णा दादासाहेबांचे काम, कार्य जवळून पाहत होते, मदतही करीत होते. दादासाहेबांनी होतकरू विद्यार्थ्यांची कुचंबणा ओळखली, तर अण्णांनी ती स्वतः अनुभवली होती. असा हा गुरू-शिष्याचा जोडा.
संस्थेच्या मदतीनेच अण्णाने एमए केले. आपलं शिक्षण झालं. आपल्यासारख्या इतर मुलांचं शिक्षण कोण करणार? ज्या समाजानं आपल्याला पोसलं त्या समाजासाठी आपण काम करायचे. हे वयाच्या २२ व्या वर्षीच ठरवून, आयुष्यभर मी (अण्णा) संस्थेचा कारभार पाहणार हे सांगताच, दादासाहेब कृतकृत्य झाले.
आपण कुणासारखं व्हायचं नाही, हे ठरवून अण्णा तसेच वागले. पुणे विद्यार्थीगृहाशी एकनिष्ठ राहून महाराष्ट्र विद्यालयाची पूर्णतः घडण त्यांनी केली.साचेबंद शिक्षणाला अण्णासाहेबांचा पहिल्यापासूनच विरोध होता. कुणाचेही अनुकरण न करता, मळलेली वाट न चोखाळता, अनेक नव्या कल्पना राबविल्या. स्वाध्यायमालेतून चरित्रात्मक पुस्तकांचे वाचन, उदरनिर्वाहासाठी औद्योगिक शिक्षणाची जोड, त्यासाठी कॉलेजात अनेक पदविका अभ्यासक्रम, सांस्कृतिक जडणघडणसाठी धार्मिक व नैतिक शिक्षण, कलागुणांसाठी संगीत/चित्रकला/क्रीडा यात स्पर्धा, स्वदेशाभिमानासाठी मातृभाषेतून शिक्षण, लष्करी शिक्षण सुरू केले. सुट्टीचा विनियोग गीतेचा/ सदाचारचिंतनीचे वाचन, विद्यार्थ्यांच्या चौफेर विकासासाठी सतत प्रयत्नशील होते. संस्थेच्या ऑफसेट मुद्रणालयामुळे पुस्तकांचे प्रकाशनही होत असे. इंग्रजी भाषेतील एक खर्डा वक्ता म्हणून अण्णांची स्वतःची ओळख होती. शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक, भारत सरकारचे राष्ट्रीय शिक्षक पारितोषक. अनेक देशात उच्चशिक्षण घेताना त्यांच्या शिक्षणपद्धतीतील मर्म समजून घेऊन तिथल्या अनुभवावर, निरीक्षणावर लेखन/संशोधन/व्याख्यानासाठी दौरे चालू होते. थोडक्यात दादासाहेबांनी लावलेला वृक्ष अण्णासाहेबांनी विस्तारला, समृद्ध केला. शिक्षणक्षेत्रात सर्व उच्च पदाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडल्या. कुणाला दुखावले नाही. सर्वत्र विखुरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज पीव्हीजीच्या पुणे, नाशिक, अजमेर, तळेगाव, मुंबई (घाटकोपर), नवी मुंबई (नेरुळ) या शाखा संपन्न आहेत. अत्यंत ताकदीने सर्वत्र कार्य चालू आहे. प्रत्येक समारंभाच्या आधी या दोन तपस्वीचे स्मरण होते. नव्या पिढीने गोविंद मुसळे यांचे “दोन तपस्वी” हे पुस्तक अवश्य वाचावे.
अण्णासाहेब खैर यांनी कर्तव्यातून संस्थेची सेवा केली. त्यांची पहिली २२ वर्षे परिस्थितीमुळे दारिद्र्यात गेली. पुढची २८ वर्षे स्वेच्छेने दारिद्र्य स्वीकारले. संस्थेचे काम करताना किमान वेतनाचीही अपेक्षा नव्हती. अशी ५० वर्षे संस्थेचे काम केले. पत्नीचे सहकार्य होतेच. वयाच्या ७२व्या वर्षी प्रमुखपद खाली करताना संस्थेला भरघोस देणगी दिली. “सदाचार चिंतनी” हा डॉ. खैरांचा उत्तम विचारांचा संग्रह आहे. माणसे तोडू नका. समाजासाठी काम करा. शिक्षणाला पर्याय नाही.
शिक्षणतज्ज्ञ डॉ. ग. श्री. अण्णासाहेब खैर