Friday, July 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगंगा मेरी माँ का नाम...

गंगा मेरी माँ का नाम…

श्रीनिवास बेलसरे

‘तुमसे अच्छा कौन हैं’चे (१९६९) लेखक होते सचिन भौमिक आणि निर्माता-दिग्दर्शक होते प्रमोद चक्रवर्ती. शम्मी कपूर, बबीता, प्राण ललिता पवार, मेहमूद, शुभा खोटे, लीला मिश्रा असे कसलेले कलाकार असलेल्या सिनेमाचे संगीत होते शंकर-जयकिशन यांचे! गीते होती राजेंद्र कृष्णन आणि हसरत जयपुरी यांची.

सिनेमाची कथा अगदी ढोबळ होती. अशोक (शम्मी कपूर)ला आपल्या बहिणीच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी १५ हजार हवे असतात. त्यासाठी तो सरोजिनीबाईंकडे नोकरी पत्करतो. त्यांच्या जुळ्या बहिणीला प्रेमविवाहाच्या आलेल्या वाईट अनुभवामुळे आपल्या मुलींनी पारंपरिक पद्धतीनेच लग्न करावे असे त्यांना वाटत असते. त्या शम्मी कपूरला मुलीना नियंत्रणात ठेवण्याचे, शिकवायचे काम मिळते. तो या कामात बराचसा यशस्वीही होतो. मात्र त्यात एक मुलगी आशा (बबीता) आणि शम्मी कपूरचे प्रेम जमते. सरोजिनीबाईना हे अजिबात न पटल्याने अशोकची नोकरी जाते आणि त्या आशालाही लंडनला पाठवतात. पूर्वी सिनेमाच्या गाण्यांच्या पुस्तकात लिहिलेले असायचे “आगे परदेपर देखिये”… तसेच

यावेळी ते ‘युट्यूबपर देखिये’ असे म्हणावे लागेल!

या सिनेमात राजेंद्र कृष्णन यांनी लिहिलेले एक सुंदर देशभक्तीपर गाणे होते. दिग्दर्शक देईल त्या, खरे तर कोणत्याही विषयावर सहजपणे हुकुमीपणे लोकप्रिय होऊ शकणारी गीते लिहू शकणाऱ्या राजेंद्रजीनी या गाण्यात जणू आधुनिक भारताचे शब्दचित्रच काढले होते. देशाचे हल्लीचे चित्र पाहून अनेकदा विचार येतो, हे जुने समाजाचे भावबंध एकत्र बांधून ठेवणारे, जनमानसात देशप्रेम जागृत करणारे, उदात्त मानवी मूल्यांचे संगोपन करणारे सगळे कलाकार गेलेत तरी कुठे? असे वाटत राहते. राजेंद्रजींनी या गाण्यात अलीकडे चर्चेत असणारी ‘आयडिया ऑफ इंडिया’च जणू स्पष्ट केली होती. गाण्यापूर्वीच्या शेरवजा दोन ओळीत महंमद रफीच्या दमदार पण नितळ आवाजात मोठा विचार शब्दबद्ध केला होता –

‘ना मैं सिंधी, ना मैं मराठी, ना मैं हूं गुजराती.
ना तो हैं एक भाषा मेरी, ना मेरी एक जाती.’

या ओळींनतर शंकर-जयकिशन यांच्या धडाकेबाज ठेक्यात गाणे सुरू होते आणि प्रत्येक ओळीओळीतून भारताची व्याख्याच स्पष्ट करते.

‘गंगा मेरी माँ का नाम, बाप का नाम हिमाला.
अब तुम खुदही फ़ैसला कर लो मैं किस सुबेवाला…’

भव्यदिव्य विषय हाताळायचा म्हटल्यावर सिद्धहस्त कलाकाराला मनाचा कॅनव्हास लाईफसाईझपेक्षाही मोठा करणारी विशाल प्रतीके सहज सुचत जातात! राजेंद्रजी पुढे म्हणतात – ‘प्रत्येक भारतीयाची आई ही स्वर्गातून निघून ३ देश आणि ११ राज्ये पार करूनही उरणारी जीवनदायी गंगा नदीच आहे.’ अशी सुरुवात केल्यावर स्वभाविकपणेच ते वडिलांची उपमा महामेरू हिमालयाला देतात. आज भाषा, धर्म, जात या डबक्यात रमणाऱ्या खुज्या लोकांना गीतकार विचारात आहेत, “आता तुम्हीच मला सांगा मी कोणत्या प्रांतातला?”
अशी जबरदस्त सुरुवात झाल्यावर कवीच्या लेखणीतून कविता अक्षरश: झरझर स्त्रवू लागते. स्वत:च्या गौरवशाली देशाची व्याख्या करताना कवी आपल्या हवामानाचेही कौतुक करू लागतो. माझ्या देशात इतर देशांसारखे दोन नाही, तर चार ऋतू आहेत. तो म्हणतो, ‘इथे सकाळ होते ती नादब्रम्हाची उपासना करणाऱ्या आमच्या गायकांच्या सुरेल गायनाने !’ आणि आमची रात्र जणू हळुवारपणे सतार वाजवतच आम्हाला झोपी घालते –

‘जिस धरतीका मैं बेटा हूं
उसके मौसम चार,
गर्मी, सर्दी, पतझड़ और,
अलबेली ऋतू बाहर!
जहाँ सवेरा गाता आये,
रात बझाये सितार…
रात बझाये सितार… ’

आपल्या पूर्वेकडील राज्यातील एखाद्या ठिकाणची वेळ आणि पश्चिम सिमेवरील दुसऱ्या गावातील वेळे यात तब्बल अर्ध्या तासाचा फरक पडू शकतो इतका माझा देश विशाल आहे, याचाही कवीला मोठा अभिमान आहे.

मैं वो पंछी जिसकी
निसदिन लाखों कोस उड़न
उत्तर, दखिन, पूरब, पश्चिम,
गूंजे मेरी तान, देश विशाल हैं मेरा,
जिसका नाम हैं हिन्दुस्तान!

देशाच्या संकृतीची ओळखही कवी ५/६ ओळीत करून देतो.

बंगला प्रांत में जाऊ तो मैं करू कलासे प्रीत,
जब आऊ पंजाब तो, भंगड़ेका बन जाऊ मीत

एकेकाळी राष्ट्रीय एकात्मता टिकवणे हे सरकारचे मोठे मिशन मानले जाई. दूरदर्शनसारखे जबाबदार प्रसारमाध्यम तर त्यात अतिशय कलात्मक असे योगदान देत असे. ‘मिले सूर मेरा तुम्हारा…’ हे गीत खरे तर एक सरकारी जाहिरात होती, पण आजही ती कितीतरी लोकांच्या मनात ताजी आहे. लोकांच्या मनात देशभक्ती आणि एकात्मता जागृत करू शकते. एखाद्या सिनेगीताइतकीच ती आजही लोकप्रिय आहे. तसाच उदात्त विचार राजेंद्रजींनी या गाण्यात खुबीने गुंफला होता. त्यात हरियाना हे राज्य नव्यानेच स्थापन झाले होते त्याचीही नोंद ते घेतात –

मैं मद्रासी, मैं गुजराती, मैं एक राजस्थानी,
बड़ा पुराना एक मराठी, नया नया हरियाणी
मैं कुछ भी हूं, लेकिन सबसे पहले हिन्दुस्तानी… गंगा मेरी माका नाम….

आज, जेव्हा माणसा-माणसातले अंतर वाढते आहे, जाणीवपूर्वक वाढवले जाते आहे, तेव्हा ‘मैं कुछ भी हूं लेकीन, सबसे पहले हिंदुस्तानी!’ म्हणणाऱ्या विचाराची केवढी गरज आहे जे जाणवते! आणि कदाचित तोच विचार मागे पडतो आहे की काय अशी भीतीही वाटत राहते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -