अॅड. रिया करंजकर
मुंबई हे भारतातील सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे. या शहरांमध्ये प्रत्येक राज्यातून, जिल्ह्यातून आणि प्रांतातील लोक उद्योगधंद्यासाठी या शहराकडे आकर्षित होत आहेत आणि हे मुंबई शहर सर्व जनमानसांना पोसतही आहे. काही लोक एकटे येऊन ग्रुप करून या शहरांमध्ये राहतात, तर काही लोक आपले कुटुंब घेऊन या शहरांमध्ये वास्तव्य येतात. कुटुंबाला घेऊन आल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो घराचा. त्यामुळे या शहरांमध्ये भाड्याने घरे दिली जातात. परप्रांतातून आलेले कुटुंब या भाड्याच्या घरात राहून आपला उदरनिर्वाह सुरू करतात, पण अशाच भाडोत्रींकडून अनेक मालकांची फसवणूक झालेली आहे.
एडवर्ड हा ख्रिश्चन युवक असाच उद्योगधंद्यासाठी मुंबई शहरात आला. येताना तो आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन आला. तो आपल्या नातेवाइकांसोबत राहू लागला. नंतर भाड्याने घर शोधू लागला. माझगाव येथे पगडी सिस्टममध्ये मिस्टर कदम यांचं घर भाड्याने द्यायचे आहे, असे त्याला समजले. त्याने कदम यांची भेट घेतली व कदम आणि एडवर्डमध्ये लिव्ह लायसन्स करार होऊन एक वर्षासाठी कदम यांनी एडवर्ड याला घर भाड्याने दिलं. सुरुवातीला एडवर्ड यांनी कदम यांना व्यवस्थित भाडे द्यायला सुरुवात केली आणि घरमालक कदम यांचा विश्वास यांनी संपादित केला. विश्वासू भाडेकरूप्रमाणे तो वागू लागला.
अचानकपणे मिस्टर कदम यांना पैशाची गरज भासली व त्यांनी हा रूम विकण्याचा विचार केला. कारण त्यांना आर्थिक गरज होती. ही गोष्ट एडवर्डच्या कानावर आली व त्याने मिस्टर कदम यांच्याशी चर्चा केली व हा रूम विकत घेतो, असं त्याने मिस्टर कदम यांना सांगितलं. यांना वाटला हा विश्वास माणूस आहे व एवढे वर्ष तो आपल्या घरात भाडेकरू म्हणून राहत आहे. त्याने कधीही भाड्याची रक्कम थकवलेली नाही, असा विचार करून कदम यांनी एडवर्डला रूम देण्याचा विचार केला व त्यासाठी एक अमाऊंट फिक्स केली.
एडवर्ड याने अर्धी रक्कम अगोदर कदम यांना दिली व त्याने चतुराईने त्या अर्ध्या रकमेमध्ये रूम स्वतःच्या नावावर ट्रान्स्फर करून घेतला व उर्वरित रक्कम नंतर देतो, असं त्याने सांगितलं. काही काळानंतर एडवर्ड उरलेली रक्कम देत नाही म्हणून कदम एडवर्डकडे गेले असता एडवर्ड यांनी सरळ सांगितलं की, मी तुम्हाला पूर्ण रक्कम दिलेली आहे. तुम्ही खोटं बोलत आहात, कारण पूर्ण रक्कम दिल्याशिवाय कोणीही रूम ट्रान्स्फर करत नाही, असं तो बोलू लागला. त्यावेळी कदम यांनी त्याला मुदत देऊन माझं घर खाली कर, असं सांगितलं. तरी एडवर्ड यांनी कदम यांची रूम खाली केली नाही. त्यांच्याविरुद्ध लघू वाद न्यायालयामध्ये केस फाइल केली आणि ती केस अजूनही प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे कदम यांनी माझगाव कोर्टामध्ये एडवर्ड याच्याविरुद्ध फौजदारी खटला चालू केलेला आहे. दोघांनी एकमेकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे न्यायालयामध्ये दाखल केलेले आहेत.
या केसमध्ये एडवर्ड यांनी अक्षरश: कदम यांची फसवणूक केलेली आहे. कारण कोणीही अर्धवट रक्कम देऊन रूम नावावर ट्रान्स्फर करून घेत नाही. ते चतुराईने एडवर्ड याने कदम यांच्याकडून करून घेतलं. कारण एडवर्ड याने अगोदरच रूम मालकाचा विश्वास संपादन केलेला होता. त्याच्यामुळे कदम यांना तो विश्वासू माणूस वाटला. म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व अर्धी रक्कम घेऊन त्याच्या नावे रूम ट्रान्स्फर केलेली होती. घर खरेदी आणि विक्री करताना ते सावधगिरीने केले नाही, तर घराबद्दलचे खटले न्यायालयात प्रलंबित राहतात व आपल्याला आपल्याच घरासाठी वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहत नाही.
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत.)