‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे आचार्य अत्रे यांचे समग्र व्यक्तिमत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या एकपात्री नाट्यप्रयोगाचे बादशहा सदानंद जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त…
दीपक करंजीकर
महाराष्ट्र नाट्यकलेच्या अनेक अंगणी फुलत गेलेले देशातील एकमेव राज्य आहे. नाटके, एकांकिका, नकला, एकपात्री अभिनय अशा सर्वच नाट्यकला प्रकारांना मराठी कलावंतांनी अत्यंत समर्थपणे हाताळले आहे आणि या देशात तसे इतर कोणत्याही प्रांताने घडवल्याचे दिसत नाही. या सर्व नाट्य प्रकारात एकपात्री हा प्रकार तर सगळ्यात कठीण बाब. कारण नाटकांसारखे नेपथ्य, डोळे दीपविणारी प्रकाश योजना, गुंतवून ठेवणारे संगीत, रंगमंचावर सातत्याने होणाऱ्या नट-नट्यांच्या एंट्री आणि एक्झिट असे कोणतेही गुंगवणारे कोंदण, काहीही नाट्य बळ या प्रकाराला लाभत नाही. एकच माणूस आणि तो सातत्याने बोलत, आवाजाचा जादुई उपयोग करत क्वचित वेषभूषेतील काही बदल करत, तुम्हाला तासभर तरी गुंतवून ठेवतो आणि त्याने उभे केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या मनात अनेक वर्षे रेंगाळत राहतात. हे एकपात्री कलावंताचे खरे संचित आहे.
आजपावेतो पु. ल. देशपांडे, सुहासिनी मुळगावकर, सदानंद जोशी, रंगनाथ कुलकर्णी, लक्ष्मण देशपांडे आदी कलावंतांनी आपले एकपात्री प्रयोगांचे शतक महोत्सवी प्रयोग रंगभूमीवर पेश करून नाट्य लेखकांना आव्हान निर्माण केले होते. त्यातही सदानंद जोशी यांचे स्थान अत्यंत अव्वल आहे. त्यांनी सर्वोच्च म्हणजे २७५० प्रयोगांची संख्या गाठली म्हणून ते अव्वल नाही, तर त्यांच्या विलक्षण अशा निरीक्षण आणि अभिनय क्षमतेच्या उच्च अंगाने ते लक्षणीय आहे. ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे सदानंद जोशी यांनी आचार्य अत्रे यांचे समग्र व्यक्तिमत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविले. अनेक वेळा जणू अत्रेच बोलत आहेत, ते आपल्यासमोर वावरत आहेत, असा जो ताकदीचा आभास त्यांनी निर्माण केला, त्यामुळे अत्रेसुद्धा स्तिमित झाले होते.
“मी आयुष्यात पुष्कळ विनोद निर्माण केला. पण एक दिवस स्वत:च विनोदाचा विषय होईल, अशी मात्र मला कल्पना नव्हती. सदानंद जोशी यांनी आपल्या विडंबन कौशल्याचा प्रत्यय आज लोकांना दिला. गुरूची विद्या गुरूला इतक्या लवकर फळेल, अशी काही माझी कल्पना नव्हती. सदानंद जोशी यांनी माझ्या हयातीतच मला अमर करायचे ठरवलेले दिसते. त्याबद्दल त्यांचे आभार कसे मानावे, हेच मला कळत नाही. स्वत:ची नक्कल स्वत:च्याच आयुष्यात स्वत: जिवंत असताना पाहण्याचा हा योग एक दुर्मीळ योग आहे यात शंका नाही”
दिवस होता १७ जानेवारी १९६५. मुंबईला ‘मी अत्रे बोलतोय!’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना साक्षात आचार्य अत्रे यांनी काढलेले हे उद्गार. स्वत:ची नक्कल पाहताना ते स्वत: पोट धरून हसले अशीही नोंद आहे. आचार्य अत्रे लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व विलक्षण वक्ते होते. इतके अष्टपैलू आणि शतकातून एकदाच जन्माला येणाऱ्या प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या आणि सर्वदूर ज्याच्या विनोदाची कीर्ती दिगंतपणे पसरली आहे, ज्याचे व्यक्तिमत्त्व सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात होते, ज्याच्या लकबी, ज्याच्या हरकती आणि भाषा प्रभुत्व याची उभ्या महाराष्ट्राला अनेक वर्षे सवय होती. अशा माणसावर एकपात्री करायचे आणि त्याचा प्रयोग त्याच्याच समोर करून त्याच्याकडून वाहवा मिळवायची, ही एखाद्या कलावंताच्या आयुष्यातील अत्यंत दुर्मीळ अशी घटना आहे. अत्रे यांनी तो प्रयोग पाहिल्यावर वरील उद्गार जे काढले, ते श्री सदानंद जोशी यांच्या अष्टपैलू अशा अभिनेत्याच्या ताकदीची साक्ष पटवणारे आहे.
आज सर्वत्र स्टँड-अप कॉमेडी आणि अशा प्रकारचे मनोरंजन बोकाळले आहे. पण सदानंद जोशी यांच्या काळात ना या प्रकारच्या कलेची ओळख होती, ना तिला प्रतिष्ठा. त्यामुळे एखादे कलेचे आविष्कार आपल्या अभिनय सामर्थ्याने अभिनीत करायचे, त्या कलेची जनमानसात आवड जोपासली जाईल, असेही पाहायचे आणि शिवाय त्यामुळे प्रसिद्धीची वलये निर्माण करायची, हे सगळे एकाच माणसाने करणे सोपे नाही. पण एखाद्या अविचल निष्ठेने ते सदानंद जोशी यांनी केले.
याबद्दल महाराष्ट्राने त्यांचे ऋणी राहायला हवे. स्वत:च एखादी संस्था होऊन जाणे असे हे कार्य आहे. आजच्या स्टँड-अप कॉमेडीच्या लोकप्रियतेचे बीज त्यांनी लावलेले आहे. वास्तविक सदानंद जोशी म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या पहिल्या मराठी चित्रपटातील-श्यामची आईमधील मोठा श्याम, ज्याच्या आत्मकथेतून सगळा चित्रपट फ्लॅशबॅक पद्धतीने उलगडत जातो. आज पुस्तक रूपाने ‘मी अत्रे बोलतोय’ वाचकांसमोर आले असताना सदानंद जोशी यांची एकपात्री सादरीकरणाची कलादेखील स्मरायची आणि जगवण्याची गरज आहे. याचे कारण ते नुसते अत्रे यांचे चरित्र नाही, तर एक कलाकाराने आपल्या विलक्षण अशा हातोटीने त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे जिवंत ठेवले आणि त्यासाठी नेमके काय केले, कसे साधले आणि कसे यश मिळवत नेले, याचे ते एक उदाहरण आहे. एकपात्री कलेचा एक जीता जागता वस्तुपाठ आपल्याला त्या निमित्ताने मराठी रंगभूमीला मिळत राहिला आणि अनेक कलावंतांना त्यातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळाली, हे सुद्धा खरे आहे.
सदानंद जोशी यांच्या असल्या निष्ठावान ऊर्जेचे रहस्य त्यांच्या संघ स्वयंसेवक असण्यात आहे का? कारण ते लहानपणी नित्याने माणे नाशिकला संघाच्या शाखेत जात असत. ज्यावेळी त्यांनी मी अत्रे बोलतोय या एकपात्री प्रयोगाची आखणी सुरू केली. त्यावेळी आपण काहीतरी कोणताही दीर्घ इतिहास नसणाऱ्या अभिनय क्षेत्रात पाऊल टाकतो आहोत, याची त्यांची जाणीव इतकी सखोल होती किंवा विचारपूर्वक होती की, त्याचा प्रयोग करण्यापूर्वी मार्शल मार्सो या कलावंताकडे मोनो अॅक्टिंगचे औपचारिक शिक्षण घेण्यासाठी ते फ्रान्सला १९६० साली स्कॉलरशिप घेऊन गेले होते. याला म्हणतात एखाद्या गोष्टीचा समग्र पाठपुरावा करणे. आज अगदी ६० वर्षांनंतरही असा अभ्यासक्रम पूर्ण करणारे ते एकमेव मराठी कलाकार आहेत. नुसते शिक्षण घेतले आणि नंतर प्रयोग केले, असे झाले नाही, तर नाटकांच्या शिवाजी मंदिरसारख्या मोठ्या नाट्यगृहात असले प्रयोग लावून ते हाऊसफुल्ल करणारे ते एकमेव कलावंत आहेत. ‘मी अत्रे बोलतोय’चे तीन हजार, ‘हास्यकल्लोळ’चे आठशे प्रयोग आणि ‘एकपात्री स्वामी’चे ६० प्रयोग त्यांनी केले. ही कारकीर्द अत्यंत अभिमानस्पद अशीच आहे. अशा थोर कलावंताचे स्मरण केवळ प्रेरणा नाही, तर संघर्षात यशाची बिजे असतात, याचा प्रत्यय देणारे आहे. आजच्या झटपट रंगारी जमान्यात तर सदानंद जोशी यांचे रंगकर्मी आयुष्य, त्या पाऊलखुणावर आदराने आणि सन्मानाने चालावे, इतके अनुकरणीय आणि अपरिहार्य आहे.