जन्म बाईचा...!

अनुराधा दीक्षित


आपण कोकणी माणसं. प्रवास करताना एसटी म्हणजे आपली जीवाभावाची मैत्रीण! भले तिला कोणी लाल परी, लाल डबा म्हणोत... हल्ली तिचं रूप, रंग बरंच बदलतंय ही चांगली गोष्ट आहे! आमच्यासारख्या खेड्यापाड्यात राहणाऱ्यांना एसटीशिवाय पर्याय नाही हे खरं. मध्यंतरी ३-४ महिने ती बंद होती, तेव्हा किती त्रास लोकांनी सोसला हे तेच जाणे... असो. मला एसटीवर निबंध लिहायचा नाहिये. पण तिने अनेक माणसांचे नमुने मात्र अगदी जवळून दाखवले.


मी एसटीतून प्रवास करताना आजूबाजूला जी माणसं दिसतात, त्यांचं निरीक्षण करीत असते. काही वेळा अगदीच अनोळखी माणसंही कायमची लक्षात राहतात, ती अगदी साध्याशा घटनेने...! एकदा मी रत्नागिरीला जात होते. साधारण राजापूरच्या पुढे कुठेतरी काही माणसं आत शिरली. ड्रायव्हरच्या मागे एक लांबलचक आडवी सीट होती तिथे रिकाम्या जागेवर बसली. मी अगदी त्या सीटसमोरच्याच सीटवर खिडकीजवळ बसले होते. माझ्यासमोरच एक नवीन लग्न झालेलं बंजारा जोडपं होतं. तो इस्त्रीचा पांढरा लेंगा, शर्ट आणि डोक्यावर पांढरीच टोपी घातलेला. मजबूत हाडापेराचा, नाकेला, उंच, तरतरीत तरुण होता. कानात सोन्याचं कुंचलं, हातात चांदीचं कडं, बोटात सोन्याची अंगठी... नवरदेव शोभत होता. त्याच्याच बाजूला त्याची नवपरिणित बायको... टिपिकल बंजारा पोषाखात. घोळदार आरशाचा घागरा आणि चोळी, केसांच्या कपाळावरच्या दोन बाजूंच्या बटांना चांदीचे झुमके अडकवलेले, कानातही तसेच मोठे झुमके, हातभर लाल बांगड्या, पण माझं लक्ष सारखं तिच्या नाकातल्या बांगडीएवढ्या नथनीकडे जात होतं. नथनीचा एक सर कानापर्यंत नेऊन खोचलेला होता. कपाळावर ठसठशीत कुंकवाचा टिळा असा सगळा साजशृंगार तिच्या थोड्या उजळ रंगाला आणि नीटस चेहऱ्याला खुलून दिसत होता.


मध्येच खिडकीतून बाहेर दिसणारी निसर्गशोभा मी पाहत होते. झाडांना, घरांना मागे टाकत एसटी खड्डे चुकवत, खडखडत चालली होती. मध्येच माझं लक्ष त्या बंजारा जोडप्याकडे जात होतं. ती लाजत, हसत त्याच्या कानाला लागत होती. तोही जमेल तसा प्रतिसाद तिला देत होता. लांजा स्टॅण्ड आला. खमंग भजी, वड्यांचा वास येऊन प्रवाशांची जीभ खवळत होती. तशी सकाळची दहा-साडेदहाची वेळ. म्हणजे थोडी भूक पोटात असतेच ना! त्याच्या कानात ती काही तरी सांगत होती. तिला काहीतरी खायला हवं होतं. पण तो काही ते मनावर घेत नव्हता. त्यांची भाषा वेगळी होती. त्यामुळे ते नेमकं काय बोलतायत हे कळत नव्हतं. तिला खरंच भूक लागली असावी. म्हणून गाडी सुटायच्या आधी तिने कळवळून त्याला काही तरी सांगितलं, तेव्हा फट्कन् त्याने तिच्या गालावर थप्पड मारली. त्यामुळे तिची नाकातली नथनी ओढली गेली. तिला दुखलं असावं. तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. तिने आपल्या हाताने नाक गोंजारलं. एकदम गोरीमोरी झाली. त्याच्या आजूबाजूचे लोकही “अरे अरे... काय करतोस...?” असं ओरडले. तो थोडा वरमला.


पण ती मात्र नवऱ्यापासून थोड्या अंतरावर बसण्याचा प्रयत्न करू लागली. रडवेल्या चेहऱ्याने खिडकीतून बाहेर बघू लागली. इतका वेळ नवऱ्याच्या कानात कुजबुजणारी ती एकदम गप्पच झाली!


मी अगदी समोरच बसल्याने मला तिची अवस्था समजत होती. तिची दया येत होती. मनात विचार येत होते... ही तर फक्त झलक आहे... पुढे बिचारीच्या ताटात काय वाढून ठेवलं असेल कोण जाणे!


कदाचित तो रस्त्याचा ठेकेदार असेल. ही कुठेतरी पालात बसून भाकऱ्या थापत असेल. कधी रस्त्याच्या कडेला छिन्नीने दगड फोडत बसली असेल. कधी एखाद्या झाडाला कपड्याच्या झोळीत पोराला झोपवून जोजावत असेल... अशीच काहीशी दृश्यं डोळ्यांसमोर तरळून गेली. कारण ह्या गोष्टीला बरीच वर्षं झाली. तेव्हा रस्त्यांची कामं आत्तासारखी यांत्रिक पद्धतीने होत नव्हती. सगळी मनुष्यबळ वापरूनच केली जात. आता सोयीसुविधा उपलब्ध झाल्यात. तरी अजूनही कुठल्या तरी माळावर पालं पडलेली दिसतातच. आता माणसांच्या पोषाखात बदल झाला. पण, प्रवृत्तीत झाला का? असा प्रश्न मनात निर्माण होतोच. मनात खोल कुठेतरी गाणं ऐकू येत होतं... जन्म बाईचा, बाईचा... खूप घाईचा...!

Comments
Add Comment

पोटपूजेचाही उत्सव!

खास बात : विष्णू मनोहर प्रसिद्ध बल्लवाचार्य दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे तसेच शरीर ऊर्जावान ठेवणाऱ्या

भारतासाठी नवी चिंता

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’नंतर भारत आणि पाकिस्तानच्या दिशा बदलल्या. पाकिस्तानने

अभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म १४

अतिलाडाने तुम्ही मुलांना बिघडवत, तर नाही ना?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू पालक या नात्याने आपल्या मुलाने मागितलेली प्रत्येक वस्तू घेऊन द्यावी असं

‘अब ये सुहाना साथ ना छुटे...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सिनेमासाठी ‘गुमराह’ हे शीर्षक बी. आर. चोपडा, महेश भट आणि वर्धन केतकर या तीन

देवाची मदत...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर माझ्या लहानपणी मी वडिलांच्या तोंडून ऐकलेली एक गोष्ट सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते.