प्रा. प्रतिभा सराफ
वैताग आलाय’ असे आपण नेहमी म्हणतो. आपल्याला नेमका कशामुळे वैताग येतो? काही सर्वसाधारण उदाहरणे घेऊ या- आज सकाळी इस्त्रीवाल्या भैयानं मस्त इस्त्री करून कपडे आणून दिले. कपाट इतकं भरलं होतं कपड्यांनी की, इस्त्रीचे कपडे ठेवायला जागाच नव्हती. तसं कोंबून ठेवता आलं असतं. पण कपाटातल्या कपड्यांची आणि आता आलेल्या कपड्यांची इस्त्री नक्की मोडली असती. काय करावं कळत नव्हतं. मग दुसरे कपाट उघडले. तिथे तर इतके नवीन कपडे घेऊन ठेवलेले होते की, त्याच्यावरचा टॅगही निघाला नव्हता. इतका राग आला लेकीचा. तरी प्रत्येक पार्टी-फंक्शनला जाताना तिच्याकडे नवीन कपडेच नसतात म्हणून चिडचिड करत असते. ओरडलं तर म्हणते, “आई सगळ्यांचा बघून झाला हा ड्रेस फोटोमधून!” वन टाइम वेअर म्हणजे एकदाच घालून फेकून द्यायचा का कपडा? ‘होय’ असंच चिडून म्हणत ती फणकाऱ्याने नेहमीसारखीच तिथून निघून जाते.
पूर्वी पेनांमध्ये शाई भरली जायची. त्यानंतर आलेल्या बॉलपेनाची रिफिल बदलली जायची. कपडा फाटला, तर त्याची पिशवी… पिशवी फाटली, तर त्याचं पायपुसणं केलं जायचं. जुन्या साडीचे पडदे केले जायचे. कोणतीही वस्तू सरळ फेकून दिली जायची नाही आणि आता? ‘यूज अॅण्ड थ्रो’च्या जमान्यात माणसांच्या नात्यांबद्दल काय बोलावं?
मग मी आमच्या चिरंजीवांच्या कपाटाला हात लावला तर तो दुरूनच ओरडला, “माझ्या कपाटाला हात नाही लावायचा!” तोपर्यंत मी कपाट उघडले होते आणि त्यातून धाडधाड पुस्तकं खाली पडली. “तू बाहेरच ठेव पुस्तकं, माझी मी लावून घेईन!”, असं म्हणत तोही शर्टची बटणं लावत लावत घराबाहेर पडला.
कुठं ठेवणार आहे तो ही पुस्तकं? असा माझ्या मनात विचार आला. जाऊ दे… राहू दे… असा विचार करत मी मोबाइल हातात घेतला, तर मला काहीच स्क्रोल करून बघता येईना! मोबाइल पूर्णपणे भरला होता.
व्हीडिओ – ऑडिओ – फोटो आणि फाइल्सनी! तो मला इशारा देत होता की, यातील काही डिलीट करा म्हणून! मी त्याबद्दल सहजच मुलीला विचारले, तर ती कुत्सितपणे हसून म्हणाली, “बघ भरून वाहतोय ना तुझा मोबाइल… तूही किती जमवून ठेवतेस नको त्या गोष्टी!” आपल्या घरात बाई येऊन घर झाडून जाते; परंतु आपल्या मोबाइलला स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्यालाच झाडू मारावा लागतो! तिच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत “हे ठेवू का, ते ठेवू?” असा विचार करत मी काही फोटो, काही व्हीडिओ मनावर दगड ठेवून उडवले. मोबाइल तर सुरू झाला; परंतु मेंदूत भरलेला बॅकलॉग कसा रिकामा करायचा, याचा मी विचार करत बसले आणि मग डोक्यातील विचारांचा गुंता वाढतच गेला. खरंच, सोडवता येतो का गुंता? अजून हा नवीन विचार त्या गुंत्यात जाऊन अडकला. गुंता वाढतच गेला. वाढतच राहणार! वैताग आलाय!