Monday, September 15, 2025

बाबू

बाबू
डॉ. विजया वाड “बाबू, मंजूकडे कधी येणार?” “घरी कोण कोण असतंय?” “आई नि बेबीमावशी असतात.” “मग येईन की. एकटीच राहात नाहीस तू हे ऐकून आनंद झाला. मुंबैत काही सांगता येत नाही. मुली पोटासाठी निर्भयपणे एकट्या राहतात. कष्टाची कमाई, निडरमन होई. तयार असतात अगदी. “पण मी फॅमिली गर्ल आहे.” “मी पण! फॅमिली बॉय आहे. आता बॉय कसला? २६ वर्षांचा घोडा आहे. मंजू, स्वत:ला बॉय म्हणवून घेताना धन्य धन्य वाटलं बघ!” “आपण, लग्न झाल्यावर तिथला अनुभव बाळासारखा नव्वा कोरा असतोच. ना? बाबू!” “हो. सत्य आहे मंजू.” “लग्न मात्र मिळवत्या मुलीशी लग्न करणार मी.” बाबू म्हणाला. “तेच योग्य. मुंबईत डबल इन्कम हवंच हवं. मला पुरत पटलंय तुझं म्हणणं. पण नवरा मुख्य समजदार, नाही तर घरी उष्टी खरकटी... नि काढायला मी एकटी! असं असू नये.” “मी सहमत आहे.” “घरी उष्टी खरकटी नि नवऱ्याची मदत मोठी! बायकोला कामाची खोटी नि नवरा भरतो मदतीची ओटी.” “अरे, यमक जुळवलंस तू बाबू? मोठी, खोटी, ओटी.” “खरंच गं. कविता हा माझा आवडता विषय होता शाळेत.” “थांब जरासा हृदयी माझ्या ढगात लपल्या देवाss काठावरती जरा आणू दे, पुरात फसल्या नावाss” तो गाऊ लागला. तिने सूर जोडला. शाळेतली कविता होती ना! “या गावाच्या पारावरती कुणी नसे रे वेडी, गढीत नाही भुजंग शापित, जो वंशाला तोडी इथे कुणीतरी रचले होते, झिम झिम पाऊसगाणे पुढचं आठवत नाही बाबा!” “मी पुरं करतो.” “पाऊस धारा झेलीत होते, तो अन् तीही दिवाणे!” “व्वा! व्वा! बाबू! तू ने तो ये गीत पुरा किया और मेरा मन जीत लिया.” “खरंच गं?” “अगदी खरं. बाबू तू कविता कर. “शिपाई कविता” किंवा “शिपायाच्या कविता” असं शीर्षक देऊन. मी प्रकाशक शोधते. डिंपल प्रकाशन माझ्या ओळखीतले आहे. ५०० प्रती छापल्या तरी बास्. अपनेकू १०-२० भी चलेगी. म्हणायच्या समूहात नि २०-२० रुपयांना विकायच्या. २० भी छोटी रक्कम नहीं कविता के पुस्तक के लिये. २० तो २०! “खरंच. ५०० दुणे २० = १०,०००! बापरे!” तो चित्कारला. “बस ना? फुकटचे १०,०००! कितने बटाटेवडे आएंगे?” तिने हसत विचारले. “तो क्या दस हजार के बटाटेवडे लाएँगे?” “आख्खे ऑफिस को बाटेंगे.” “वा ऑफिस खूssश! नि आपण?” “खूशम् खूशम्!” “फाssर छान.” “मंजू मला खूश राहायला खूप छोटं कारण पुरतं.” “अरे तेच छान आहे. अशाने आनंदी वृत्ती राहते.” “हो ना गं?” “हो बाबू. कवितेला जातीचा, पोझिशनचा स्तर नसतो.” “हे किती छान आहे ना!” “खरंच खूपच छान आहे.” “एक कवितेची स्पर्धा आलीय बाबू. छोटी, सोपी, निसर्गकविता! खेडोपाडी गायली जावी इतकी सोपी.” “माझ्याजवळ आहे. म्हणू?” आणि तो होकाराची वाट न बघता म्हणू लागला. “एक झाड लावा बाई, अंगणी अंगणी फुलू फळू द्या गं त्याला, रिंगणी रिंगणी... पाणी शिंपा, पाणी शिंपा... जोजवा जोजवा यशोदेचा कान्हा तसा, रोप हे वाढवा... काही न मागता देई जे जे त्याच्यापाशी रोप नाही हा तर बाई कुणी देवऋषी!” “ब्राव्हो” ती ओरडली. “दोन ओळी अॅड करूया.” “कोणत्या.?” “फुले, फळे, पाने, लाकूड याबद्दल.” “फुले, फळे देई रोप देई मुक्त हस्ते पानेही हिरवी हिरवी सावली परस्ते. देई छाया करी माया वाटसरूंसाठी सावलीसारखी, देई पांथस्थासाठी!” “जमी का गं मंजूबाई?” बाबूने विचारले. “भाषा अधिकारी चकित होतील तुझी कविता बघून! बाबू!” “खरंच का गं मंजू?” “आय अॅम नॉट एक्झाजरेटिंग. तू म्हणजे प्रतिभेचा वाहता झरा आहेस बाबू. जिवंत लेणे प्रतिभेचे. अचानक सापडलेले. अलिबाबाच्या गुप्त खजिन्यासारखे.” बाबू खुलला, फुलला. त्या स्तुतीने हुरळला... गाऊ लागला, “अशी गुलझार नार कशी छान छबीदार, करीते स्तुती! मज रगरगमें झुकी, मदंतर मस्ती!” “वा! व्वा! छान.” मंजूने हवेतच मुका घेतला. बाबूने तो ओठांशी नेला. “एक उडते चुंबन मला देऊनी तूच साधला रंग! नको नको परतुनी घेऊ गं! पुन्हा करू नको बेरंग” तो म्हणाला.
Comments
Add Comment