Friday, October 31, 2025
Happy Diwali

राहुरी कृषी विद्यापीठ व ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठात सामंजस्य करार

राहुरी कृषी विद्यापीठ व ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठात सामंजस्य करार

अहमदनगर (हिं.स.) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठ यांच्यामध्ये मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कुलगुरु डॉ.पी.जी.पाटील, ऑस्ट्रेलियाचे संस्कृती, कला व आंतरराष्ट्रीय शिक्षण विभागाचे मंत्री डेव्हिड टेम्पलमन उपस्थित होते. यावेळी झालेल्या सामंजस्य करारावर संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख व आंतरराष्ट्रीय मरडॉक विद्यापीठाचे कुलपती केली स्मिथ यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी मरडॉक विद्यापीठाचे संचालक डॉ.राजीव वार्ष्णेय, अधिष्ठाता डॉ.प्रमोद रसाळ, पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सुनिल मासळकर व कुलगुरुंचे तांत्रिक अधिकारी डॉ.पवन कुलवाल उपस्थित होते.

ऑस्ट्रेलियन चमूचे नेतृत्व पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रांताचे उपमुख्यमंत्री व पर्यटन, व्यापार आणि विज्ञानमंत्री रॉजर कुक यांनी केले. या सामंजस्य करारामुळे दोन्ही विद्यापीठांमध्ये कृषि शिक्षण व संशोधनाची देवाण-घेवाण होणार आहे. यामध्ये दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व शास्त्रज्ञ यांना एकमेकांच्या विद्यापीठांतर्गत अभ्यास करता येईल.

कुलगुरु डॉ.पी.जी. पाटील यावेळी म्हणाले की, या सामंजस्य करारामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्यातून कृषि क्षेत्रामधील नाविन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे. डॉ.राजीव वार्ष्णेय यांनी सांगितले की या करारामुळे मरडॉक विद्यापीठाला महात्मा फुले कृषि विद्यापीठाबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. डेव्हिड टेम्पलमन यांनीही या सामंजस्य करारावर समाधान व्यक्त केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >