Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेआदिवासी पाडे सोलर दिव्यांनी झळाळणार...

आदिवासी पाडे सोलर दिव्यांनी झळाळणार…

ठाणे (प्रतिनिधी) : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात ठाणे, मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत जवळपास २७ छोटे-मोठे आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांमध्ये सोलर दिवे बसवण्यासाठी पाच कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत पाठपुरावा केला असून या सुविधेमुळे हे पाडे कमी खर्चात प्रकाशाने झळाळणार आहेत.

या आदिवासी पाड्यातील मूळ नागरिकांना सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून याआधी अनेक विकासकामे या आदिवासी पाड्यांवर झाली आहेत.आदिवासी पाड्यात घरे दूरदूरवर असतात. तसेच सर्व आदिवासी पाड्यावर विजेच्या जोडण्या दिलेल्या नाहीत.जरी घरात वीज आली असली तरी पाड्यांकडे जाणारे रस्ते, आदिवासी पाडे येथे पथदिवे नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ असलेले तसेच वन खात्याच्या हद्दीत येणाऱ्या आदिवासी पाड्यावर दिवे लावण्यासाठी तत्काळ वन विभागाची परवानगी मिळत नाही. अनेक ठिकाणी महावितरणचे विजेचे खांब, वीज तारा टाकण्यासाठी अडचणी येतात. तसेच वन विभागाचा ना हरकत दाखला, परवानगी मिळत नसल्याने आजवर अनेक ठिकाणी पथदिवे लागलेले नाहीत. त्यामुळे सर्व आदिवासी पाड्यांवर सोलर दिवे बसविण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली होती.

ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात ठाणे महापालिका हद्दीमधील डोंगराळ भागामध्ये, आदिवासी पाड्याकरिता सोलर दिवे बसविण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून त्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून सर्व आदिवासी पाड्यांवर सोलर दिवे लावले जातील. त्यामुळे या सोलर दिव्यांचा फायदा आदिवासी वस्तीला होणार आहे. आदिवासी पाडे, तेथे जाणारे रस्ते याचा सर्वे आधी झाला आहे. आता निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे सोलर दिवे लावण्याचे काम पुढील काही दिवसात सुरु होईल व दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास आमदार सरनाईक यांनी व्यक्त केला.

सौर पथदिवे या प्रणालीमध्ये वापरली जाणारी बॅटरी साधारण १० ते ११ तास पुरेल इतकी ऊर्जा साठवून ठेवण्यास सक्षम असते. शिवाय यामध्ये दिवे चालू व बंद करण्यासाठी एक स्वयंचलित बटन देखील असते जे सायंकाळ ते पहाट या कालावधीत दिवे वापरण्यासाठी बनविलेले असते तसेच बॅटरीला अतिरिक्त चार्ज होण्यापासून तसेच ती अतिरिक्त ड्रेन होण्यापासून म्हणजे तिची ताकद पूर्णपणे संपण्यापासून रोखते, असेही सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -