Wednesday, July 17, 2024
Homeक्रीडाजागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेची फायनलमध्ये धडक

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेची फायनलमध्ये धडक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचा सुपूत्र अविनाश साबळेने अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील ३ हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत फायनलमध्ये प्रवेश केलाआहे. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचा सुपूत्र अविनाश साबळे याने शनिवारी ३ हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाशने ८.१८.४४ इतक्या वेळेत पहिल्या ३ मध्ये स्थान मिळवले. हिट ३ मध्ये अविनाशने १ हजार ५०० मीटरपर्यंत अव्वल स्थान कायम ठेवले होते. त्यानंतर तो मागे पडला आणि सहाव्या क्रमांकावर गेला. अखेरच्या २०० मीटरमध्ये अविनाशने जोरदार कमबॅक केले आणि तिसरे स्थान मिळवले.

अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रोनो येथे मे महिन्यात झालेल्या साउंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये अविनाश साबळेने इतिहास घडवला होता. अविनाशने ५ हजार मीटर शर्यतीत ३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आणि नवा राष्ट्रीय विक्रम केला. तेव्हा अविनाशने बहादुर प्रसाद याने ३० वर्षांपूर्वी केलेला विक्रम मागे टाकला. अविनाशने १३.२५.६५ या वेळेत ५ हजार मीटर हे अंतर पार केले. त्याला १२वा क्रमांक मिळाला होता. तर जून महिन्यात प्रतिष्ठेच्या डायमंड लीग मीटमध्ये त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेजमध्ये आठव्यांदा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडला. भारतीय लष्करात असलेल्या २७ वर्षीय अविनाशने ८ मिनिटे १२.४८ सेकंद इतका वेळ घेतला होता.

अविनाशने गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम केला होता. तेव्हा अविनाशला अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळाले नव्हते. ऑलिंपिकच्या आधी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत देखील अविनाशने मोठे यश मिळवले होते. स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.

अविनाश हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा आहे. तो शेतकरी कुटुंबातील आहे. अविनाश लहानपणी ६ किलोमीटर अंतर पार करून शाळेला जात असे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करतोय. १२चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटच्या सेवेत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -