Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रसुरक्षा रक्षकाचा खून सप्तशृंग गडावर खळबळ

सुरक्षा रक्षकाचा खून सप्तशृंग गडावर खळबळ

कळवण (वार्ताहर) : सप्तशृंग गडाच्या ट्रस्टमध्ये नोकरीस असलेल्या सुरक्षारक्षक अर्जुन अंबादास पवार (वय ३०) याचा खून झाल्याची घटना समोर आल्याने सप्तशृंग गडावर खळबळ उडाली आहे. नांदुरी ते गड घाट रस्त्यादरम्यान गणेश घाटाच्या धबधब्यापुढे त्याचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये गणेश घाटाच्या धबधब्याजवळ एक तरुण पडलेला असल्याचे गडावर दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांनी पाहिले. त्यांनी न्यासाच्या कार्यालयास याबाबतची माहिती दिली. घटनास्थळावर प्रशासनाने रुग्णवाहिका पाठविली व या सुरक्षा रक्षकास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. त्याच्या मानेवर व शरीरावरील जखमांमुळे घातपात झाल्याची शंका नातेवाइकांनी व्यक्त केली. ट्रस्टकडून अधिकारी व पोलिसांना माहिती देण्यात आली. अर्जुन पवार हा सप्तशृंग संस्थानमध्ये सुरक्षारक्षक होता. भेंडी (ता. कळवण) येथे सासूरवाडीला राहून गडावर नोकरीनिमित्त तो ये -जा करत होता.

याप्रकरणी कळवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान नागरे अधिक तपास करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -