Wednesday, July 2, 2025

मुंढेगाव-कानडवाडी रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात

मुंढेगाव-कानडवाडी रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात

इगतपुरी (प्रतिनिधी) : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ते कानडवाडी हा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेकदा निवेदन देऊनही दखल घेतली गेलेली नाही. तक्रारी केल्यानंतर नांदगाव ते कानडवाडी फाटा, कानडवाडी ते नादुरवैद्य या रस्त्यांचे काम झाले. मात्र कानडवाडी ते मुंढेगाव हा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात आहे. यामुळे अनेक गावाला जाणाऱ्या या रस्त्यामुळे या मार्गाहून जाणारी बस सेवा बंद आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी मनसेने केली असून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


नांदगाव बुद्रुक येथे मनसे पदाधिकाऱ्यांची विविध विषयांवर बैठक संपन्न झाली. जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना करून आंदोलन करणार असल्याचे सांगितले. जानोरी अस्वली या रस्त्यावर ओंडओहळ असून येथे सुरू असलेल्या पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. अपूर्ण कामामुळे लोकांना प्रचंड त्रास होत असल्याने संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, दुग्ध व्यावसायिक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी या सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्धा किमी अंतरासाठी मुंढेगाव ते गोंदे मार्गे १४ किमीचा वळसा घालून अस्वलीमध्ये यावे लागत आहे.


यावेळी आत्माराम मते, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, बाजीराव गायकर, विजय गायकर, रंगनाथ खातळे, समाधान गायकर, योगेश गायकर, दीपक गायकर, संदीप यंदे, आनंदा कर्पे, काका कर्पे, सुभाष मुसळे, शरद मुसळे, वैभव दातीर, किरण बोंबले, किरण तांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment