मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरणीवर परिणाम झाला. तर जुलै महिन्यात सुरु झालेल्या अतिवृष्ठीचा भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाज्यांचे दर वाढले असून ते आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईला प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून भाजीपाला पुरवठा केला जातो. मात्र, या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याची आवक देखील घटली आहे. नाशिकहून मुंबईला होणारा भाजीपाला नेहमीच्या प्रमाणात केवळ ३० टक्के होत आहेत. नाशिकमधून मुंबईला येणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या दुरावस्थेचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे देखील भाजीपाला पुरठ्यावर परिणाम झाला आहे.
अतिवृष्टी झाल्याने मुंबई आणि ठाण्याला होणाऱ्या भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर महागले होते. गेल्या आठवड्यात मुंबईत भेंडी ६० ते ८० रुपये किलो, गवारी ६० ते ८० रुपये, शिमला मिरची ३० रुपये, दुधी भोपळा २५ ते ३० रुपये, वांगी ४० रुपये तर फ्लॉवर ४० ते ६० रुपये किलो प्रमाणं विक्री केली जात होती. तर, या आठवड्यात भेंडीचा दर प्रतिकिलो १०० ते १२०, गवारीचा दर १०० ते १२०, शिमला मिरची ४० ते ५०, दुधी भोपळा ५० ते ६०, वांगी ६० आणि फ्लॉवर ८० रुपये किलोने विकला जात आहे.