Saturday, July 5, 2025

धबधब्यांच्या रौद्रावतारामुळे वनखात्याची पर्यटकांना नाशिकमध्ये बंदी

धबधब्यांच्या रौद्रावतारामुळे वनखात्याची पर्यटकांना नाशिकमध्ये बंदी

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या हर्षवाडी गावाजवळील हरिहर गडापाठोपाठ आता पश्चिम वनविभागाने पर्यटकांच्या पसंतीचे नेकलेस वॉटरफॉल, इगतपुरी तालुक्यातील भावली धबधब्यांच्या परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव घातला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये झालेली अतीवृष्टी, यामुळे धबधब्यांनी रौद्रावतार धारण केला असून परिसरात पर्यटकांची झुंबड उडण्याची दाट शक्यता लक्षात घेता दुर्घटना टाळण्याकरिता वनखात्याने बंदी घातली आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळी सहलींचा बेत पुढे ढकलावा लागणार आहे.


कोरोनाच्या लाटेनंतर पहिल्यांदाच पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्याची निर्बंधमुक्त संधी आल्याने यावर्षी पर्यटनासाठी नागरिकांची निसर्गरम्य अशा त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या जवळच्या तालुक्यांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. अंजनेरीपासून तर थेट हरिहर गडापर्यंत आणि वैतरणापासून पेगलवाडीपर्यंत वीकेण्डला ‘जत्रा’ पहावयास मिळत होती. यामुळे या भागातील गड, किल्ल्यांच्या चढाईला वनखात्याने मनाई केली आहे.


धबधब्यांच्या परिसरातसुद्धा पर्यटकांना प्रवेश करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. वनक्षेत्रपालांच्या नियंत्रणाखाली वनरक्षक, वनपरिमंडळ अधिकारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहे. वनविभागासह नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनीही पर्यटनाच्या नावाखाली कुठलीही हुल्लडबाजी तालुक्यांच्या ठिकाणी खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. घोटी, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावतीने संयुक्तपणे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


पहिनेबारीमधील नेकलेस फॉल, काचुर्लीचा दुगारवाडी धबधबा, भावलीचा सुपवझरा, गायवझरा धबधब्यांचा परिसर, हरीहर गड, भास्करगड, वाघेरा किल्ला, त्रिंगलवाडी गड, कुरुंगवाडीचा परिसरात पर्यटकांना, हौशी ट्रेकर्स मंडळींना पश्चिम वनविभागाने बंदी घातली आहे. पुढील आदेश होईपर्यंत पर्यटकांना या भागात फिरकण्यास मनाई करण्यात आली आहे. मनाई आदेशाचे उल्ल्ंघन करुन बळजबरीने किंवा चोरवाटांनी वरील ठिकाणी प्रवेश करणाऱ्यांवर वन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा उपवनसंरक्षकांनी दिला आहे.

Comments
Add Comment