Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यशेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी

शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी

रवींद्र तांबे

राज्यात कृषी दिन साजरे करीत असताना सुद्धा राज्यातील शेतकऱ्याची उन्नती कशी होईल याकडे राज्यकर्त्यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे; परंतु सध्या राज्यात राजकीय धुळवड चालू असताना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसेल. तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना वाली कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा शेतकऱ्यांना शेती बरोबर पूरक जोडधंदे करण्याला प्रोत्साहन दिले पाहिजेत. म्हणजे, शेतकऱ्यांना जोडधंद्यामुळे आर्थिक हातभार लागून त्यांची आर्थिक उन्नती होण्याला मदत होईल. आजच्या घडीला शेतकऱ्यांना शेतीला पूरक अशी ‘बांबू लागवड’ फायदेशीर आहे.

शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी स्वतंत्र प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. पाऊस कमी-जास्त जरी पडला तरी कोणत्याही प्रकारचे नुकसान बांबूचे होत नाही. मात्र, रानटी डुकरांपासून जपावे लागते. जर त्यांची स्वारी आली, तर पूर्ण बांबूची रोपे मुळासकट उपटून त्याचे मूळ खाऊन नुकसान करतील, यापासून काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी शेतीबरोबर बांबूचा मळा फुलविण्याची जिद्द शेतकऱ्यांनी निर्माण केली पाहिजे. बांबू लागवडीचा विचार करता विशेषतः कोकणातील शेतकऱ्याच्या दृष्टीने हा जोडधंदा खूप उपयुक्त आहे. कोकणात बांबूला ‘चिवो’ असेही म्हणतात. कोकणात बांबूच्या मांगा प्रजाती आढळून येतात. एका बांबूची किंमतही ५० ते ६० रुपये असते. तशा प्रकरची जमीन तसेच पाणीही कोकणात आहे. तेव्हा कोकणातील शेतकऱ्यांनी राजकीय आकड्यात न जाता बांबूची लागवड केल्यास त्यांना शेतीबरोबर आर्थिक हातभार लागू शकतो. यासाठी स्वत:हून शेतकऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत. याचा परिणाम कोकणातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन घेऊन आपल्या जमिनीमध्ये बांबूची लागवड करायला काहीच हरकत नाही. यामुळे जमिनीची धूपसुद्धा कमी होते. बांबू बहुपयोगी वनोपज असल्यामुळे त्याला ‘हिरवे सोने’ असेही म्हणतात. यामुळे मानवाच्या अनेक गरजा पूर्ण करू शकत असल्यामुळे ‘गरिबांचे लाकूड’ असेही म्हटले जाते.

बांबूपासून विविध प्रकारचे नक्षीदार फर्निचर, आयदाने, प्लाय बोर्ड, कागद, इमारतीचे बांधकाम करण्यासाठी बांबूचा आधार घेणे अशा अनेक कामासाठी बांबूचा उपयोग केला जातो. इतकेच नव्हे तर बांबूच्या कोंबाची भाजीसुद्धा केली जाते. नॅशनल पार्क मधील आदिवासी बांधव मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनच्या परिसरात बांबूचे कोंब विक्रीसाठी बसलेले दिसतात. आदिवासी बांधवांच्या मते पावसाळ्यात पाऊस पडल्यावर जे बेट बांबूचे असते. त्याच्या बाजूला नवीन बांबूची रोपटी तयार होतात. अर्थात जे कोंब येतात, ते खणून त्याची वरील पातळ साल काढावी. आरोग्याला रानटी भाजी म्हणून उपयुक्त असते. कोकणातील रान भाजीमध्ये त्याचा समावेश आहे. आजही कोकणात काही ठिकाणी बांबूच्या कोंबाची भाजी करतात. तसेच त्याचा हिरवा गार चारासुद्धा वैरण म्हणून बैल, गाई, म्हशी आवडीने खातात. इंधन म्हणून सुद्धा वापर केला जातो. असा हा बांबू बहुपयोगी वनोपज आहे. तेव्हा शेतीला पूरक जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी त्याची लागवड करावी.

यासाठी लागवड करताना शेतीच्या बांधाला, नदीकाठी, डोंगराच्या पायथ्याशी किंवा ज्या ठिकाणी धरण किंवा विहीर आहे, अशा ठिकाणी त्याची लागवड करावी. तीन-चार वर्षे झाली की, आपण त्यांचा योग्य कामासाठी उपयोग करू शकतो. तेव्हा त्याचे संगोपन महत्त्वाचे असते. त्याला पावसाळ्यापूर्वी शेणखत, लेंडी, राख, झाडांचा पालापाचोरा व मातीची भर घालावी. मात्र रानटी डुकरांपासून सावधगिरी घ्यावी लागेल.

चालू वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची कामे उशिरा सुरू झाली आहेत. आता समाधानकारक पाऊस पडत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे शेतकरी राजा जेरीस आला आहे. त्यात मागील वीस वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. त्यावरती रुपये १० लाखांच्या वर खर्च करून अहवाल तयार करण्यात आला. त्याचा अभ्यास कदाचित चालू असेल. मात्र शेतकरी सध्या स्वत:हून सावरत आहेत. राजकीय मंडळीही पक्षवाढीच्या कामकाजात गुंतल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तेव्हा लोकनेत्यांनी पक्षवाढीबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सुद्धा लक्ष द्यायला हवे.

तसेच, राज्यातील कृषी दूताने केवळ बांधावर जाऊन चालणार नाही, तर कोपऱ्यात उतरून योग्य ते प्रशिक्षण दिले पाहिजे. सबसिडीचा फायदा घेऊन शेतीला पूरक व्यवसाय कसा सुरू करता येईल. यासाठी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. शेतकऱ्यांचा वाडी आणि गावातील गट तयार करून त्या गटांना अधूनमधून भेटी देऊन शेती सांभाळून इतर कामे कशी करू शकतात यासाठी प्रोत्साहन देणे. निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक बाजू मजबूत होणार नाही. सध्या पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकरी राजांच्या शेती व्यवसायामध्ये नुकसान होऊ लागले आहे. यामध्ये कधी सुखा दुष्काळ, तर कधी ओला दुष्काळ त्यामुळे आता शेतकरी राजाने शेतीला पूरक जोडधंदा सुरू करायला हवा. तसे अनेक जोडधंदे सुरू करता येतील. मात्र सध्याच्या परिस्थितीत बांबू लागवड सोयीची आहे. तेव्हा शेतीबरोबर बांबूची लागवड केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो.

मागील वर्षापासून राज्यात अटल बांबू समृद्धी योजना व बांबू लागवड योजना सुरू करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात जे शेतकरी असतील, त्यांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल, याकडे लक्ष द्यावे. तेव्हा राज्यातील शेतकरी बांधवांनी शेतीबरोबर आपल्या मोकळ्या जागेत शेतीला पूरक जोडधंदा म्हणून बांबू लागवड करावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -