ठाणे : केडीएमटी बसच्या धडकेमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. या मृत्यूला खड्डेच जबाबदार असून याधीही पाच जुलैला ठाण्यात खड्ड्यामुळे तोल जाऊन एका तरुणाचा अपघात झाला होता.
नेवाळी खोणी गाव नाक्याजवळ शनिवारी सकाळी केडीएमटीच्या कल्याण-पनवेल बस क्रमांक २० या गाडीने एमएच ०५ ८२२५ नंबरच्या दुचाकीला धडक दिली. खड्ड्यामुळे या तरुणाच्या गाडीचा तोल गेला आणि बसने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघाताची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. दरम्यान, नेमका हा अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. खड्ड्यामुळे तोल जाऊन हा अपघात घडला की बस चालकाच्या चुकीने तरुणाच्या दुचाकीला धडक दिली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
याआधी पाच जुलैलाही ठाण्यात खड्ड्यामुळे तोल जाऊन एका तरुणाचा अपघात झाला होता. खड्ड्यामुळे तोल जाऊन खाली पडलेल्या तरुणाच्या शरीरावरुन भरधाव एसटी धडधडत गेली होती आणि त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे सध्या रस्त्यांची चाळण झाली आहे. बहुतांश ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीही होत आहे. तर दुचाकीस्वारांचा खड्ड्यांमधूनच जीवघेणा प्रवास सुरु आहे. मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील बहुतांश भागाला झोडपून काढले आहे. त्यानंतर आता रस्त्यांची दुर्दशा झाली असून खड्डे बुजवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर केव्हा काम करणार, असा प्रश्न संतप्त लोकांकडून विचारला जात आहे.