Sunday, August 31, 2025

राज्यात पंधरा दिवसात पावसाचे १०२ बळी, अनेक बेपत्ता!

राज्यात पंधरा दिवसात पावसाचे १०२ बळी, अनेक बेपत्ता!

मुंबई : राज्यात गेल्या पंधरा दिवसात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतक-यांसह व्यापा-यांना मोठ्या नुकसानीलाही समोरे जावे लागले आहे. यामध्ये गेल्या पंधरा दिवसात सुमारे १०२ लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात १ जुलैपासून आत्तापर्यंत पंधरा दिवसात १०२ जणांचा बळी गेला आहे. गेल्या चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकज जण बेपत्ता आहेत. यामध्ये १८१ जनावरांचाही मृत्यू झाला आहे.

राज्यात २७ जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला. या जिल्ह्यांतील २५० हून अधिक गावांमध्ये नद्यांचे पाणी घुसले. राज्यात आतापर्यंत सुमारे १४०० घरांचे नुकसान झाले आहे. तर ४४ घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत.

पुराच्या पाण्यात वाहून जाणे, तसेच मुसळधार पावसामुळे १८१ जनावरे दगावली आहेत. सुमारे आठ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक फटका गडचिरोली जिल्ह्याला बसला असून सुमारे दोन हजार नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. राज्यात ठिकठिकाणी जवळपास ५२ मदत कँप उभारण्यात आले आहेत.

Comments
Add Comment