ठाणे : ठाणे जिल्ह्यात मुख्य मार्ग आणि महामार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीसमोर ठाणे पोलिसांनीही आता गुडघे टेकल्याचे बोलले जाते. नागरिकांनी अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका किंवा रेल्वेगाड्यांतूनच प्रवास करा, अशा सूचना त्यांनी वाहन चालकांना दिल्या आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे. ठाणे पोलिसांच्या ट्विटर खात्यावरून त्यांनी ही सूचना प्रसारित केली आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूलाच्या पायथ्याशी खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोपरी रेल्वे पूल ते कॅडबरी जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे ठाणे, घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले.
पूर्व द्रुतगती महामार्गावरून हजारो वाहनांची वाहतूक होते. येथील कोपरी पूलाच्या पायथ्याशी ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे सकाळी या मार्गावर कोपरी पूल ते कॅडबरी जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी होते. कामानिमित्त मुंबईत खासगी वाहनाने जाणाऱ्या वाहन चालकांचे या वाहतूक कोंडीमुळे हाल झाले. तर या मार्गावरुन बेस्ट, टीएमटीच्या बसगाड्याही अडकून होत्या. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत होता. अवघे १० मिनिटांचे अंतर पार करण्यास वाहन चालकांना पाऊण तास लागत आहे.
खारेगाव टोलनाका भागातही मोठे खड्डे पडल्याने शिळफाटा, गॅमन रोड, दहिसर मोरी, वाय जंक्शन, मुंब्रा बाह्यवळण भागात त्याचा परिणाम वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ट्विटर खात्यावर वाहन चालकांना सूचना केल्या आहेत.