मुंबई : राज्यात नदी नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र आज रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.