Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रजगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर आवश्यक : कोश्यारी

जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर आवश्यक : कोश्यारी

नाशिक (प्रतिनिधी) : ज्ञान, माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण यामुळे शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावत असतात. येणाऱ्या काळात संपूर्ण जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक आहे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील विद्यापीठासमवेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामंजस्य करार अशा कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी पश्चिम ऑस्ट्रेलियाचे पहिले आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन, युनिर्व्हसिटी ऑफ नॉट्रे डेम ऑस्ट्रेलियाच्या कुलगुरु सेलमा अलिक्स, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही भारतीय युवा शक्तीने प्रेरित असून भारतातील आणि महाराष्ट्रातील विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करण्यास ते उत्सुक आहेत, ही बाब आनंदाची आहे. येणाऱ्या काळात एकसमान शिक्षण पद्धत संपूर्ण जगात असणे ही काळाची गरज ठरणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत वेगवेगळ्या पॅथींचा समावेश आहे. पण आजच्या विद्यार्थ्यांना या पॅथी शिकताना रुग्णांबरोबर सहानुभूती दाखवणे आवश्यक आहे, तरच हे विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या पॅथी चांगल्या समजू शकतील.

भारतासह अन्य देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आरोग्य, दळवणवळण, पायाभूत सुविधा याबरोबरच शिक्षण क्षेत्रातही प्रगती केली आहे. भारतासह सगळेच देश प्रगतीबरोबरच शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गौतम बुद्ध यांचे विचार आणि भगवान महावीर यांची शांततेची शिकवण भारतासह इतर देशांनाही प्रेरित करत आहे. आपल्या आताच्या शिक्षणात सुद्धा शांतता आणि एकात्मता यावर भर असणे आवश्यक आहे. भारताने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्याचे निश्चित केल्यानंतर हा दिवस १०८ देशांमध्ये साजरा केला जातो हीच आपली एकात्मता आहे, असेही कोश्यारी यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -