Wednesday, May 7, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्केच

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्केच


ठाणे : उद्धव ठाकरे यांनी हटवले असले तरीही नरेश म्हस्के यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुनर्नियुक्ती केली आहे. शिंदे यांच्या समर्थनार्थ म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर म्हस्के यांची या पदावरून हकालपट्टी करत असल्याचे ‘सामना’ दैनिकातून ज़ाहीर करण्यात आले होते. मात्र, ही हकालपट्टी आता बेकायदेशीर ठरवून धुडकावण्यात आली आहे.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गिय आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणाऱ्या कट्टर शिवसैनिकांला पदावरून हटविण्याचे अधिकार ‘सामना’ला नाहीत, असे स्पष्ट करत जिल्हाप्रमुखपदी नव्या जोमाने काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना दिले आहेत.


जिल्हाप्रमुख पदाची सुत्रं पुन्हा म्हस्के यांच्या हाती सोपविताना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पक्ष विस्ताराच्या मोहिमेबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. आजपर्यंत मनमानी पद्धतीने हकालपट्टी केलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा त्याच पदांवर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.


शिवसेनेच्या घटनेनुसार कोणत्याही पदाधिकाऱ्याला त्याचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय तडकाफडकी पक्षातुन काढून टाकणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यासाठी त्या पदाधिकाऱ्याला रीतसर नोटीस देऊन त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी लागते. मात्र अशा कोणत्याही प्रक्रियेचा अवलंब नरेश म्हस्के यांना पदावरून काढताना अनुसरण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांची हकालपट्टी बेकायदेशीर ठरत असून त्यांची पुन्हा त्याच पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हस्के यांच्याप्रमाणे. पक्षातून हकालपट्टी झालेल्या पदाधिकाऱ्यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.

Comments
Add Comment