
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हयात आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वात जास्त ५ लाख ५० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सर्वात जास्त कापूस लागवडीचा जिल्हा जळगावच राहणार आहे. दरम्यान, आज पावसाने उघडीप दिली असल्याने पाच दिवसानंतर सूर्य दर्शन झाले. याचा पिकांना लाभ होईल. शेतक-यांसाठी बफर्स स्टॉकमधून युरिया व डीएपी ही खते वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कृषि विभागाला दिले असल्याची माहिती जिल्हा कृषि अधीक्षक संभाजीराव ठाकूर यांनी दिली.
जळगाव जिल्हयाचे लागवडी लायक क्षेत्र ८ लाख ४८ हजार ३०० हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ६६ हजार ९२८ हेक्टर आहे. गेल्या खरीप हंगामात जिल्हयात ५ लाख ३७ हजार ३३७ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ होऊन यंदा ५ लाख ५० हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड होत आहे. त्यामुळे यंदादेखील राज्यात सर्वात जास्त कापूस लागवड जिल्हा म्हणजे जळगावचा समावेश होईल, असा दावा केला जात आहे.
कापसाच्या वाढत्या लागवडीमुळे जिल्हयात यंदा ज्वारी, बाजरी, मका व अन्य तृणधान्य यांच्या खरीप क्षेत्रात देखील २५ टक्के घट झालेली आहे, त्याचबरोबर कडधान्य पेरणीत देखील २४ टक्के घट आहे. चाळीस वर्षापूर्वी जळगाव जिल्हयात सर्वात जास्त तेलबियांची लागवड होत असे. आज तेलबियांचे क्षेत्र नगण्य झाले असून आज जिल्हयातील शेतकरी नगदी पिक असलेल्या कापूस लागवडीकडे वळला आहे. त्यामुळे राज्यात सर्वात जास्त कापूस लागवड ही जळगाव जिल्हयात झाली आहे. आज जिल्हयात कापसावर प्रक्रीया करणा-या ११० वर जिनिंग प्रेस असून त्यांची ८०० कोटींची उलाढाल आहे. जिल्हयाचे कापसाचे संपूर्ण अर्थकारण तीन हजार कोटींचे असण्याचे सांगण्यात येते. मध्यंतरीच्या काळात जिल्हयात साखर कारखानदारीमुळे उसाचे क्षेत्र वाढले होते. मात्र जिल्हयातील साखर कारखाने बंद पडल्याने उसाचे क्षेत्रदेखील मोठया प्रमाणावर घटले आहे.
जिल्हयात पाच लाख ५० हजार हेक्टरमध्ये होणारी कापूस लागवड लक्षात घेता २७ लाख ५० हजार बियाणे पाकीटांची मागणी राहील, असा अंदाज होता. आतापर्यंत २५ लाख बियाणे पाकीटांची विक्री झाली आहे. खतांचा तुटवडा भासू नये म्हणून काळजी घेतली जात असून आज एक लाख ४८ हजार मे. टन खते उपलब्ध झाले आहेत. पेरणी झाल्यानंतर खतांची गरज भासणार हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गुरूवारी कृषि विभागाला बफर्स स्टॉकमधून ५३०० मे.टन युरिया वाटपाचे तसेच ६०० मे. टन डीएपी खते वितरीत करण्याचे आदेश दिले. कृषीविभागाने एक ब्लॉग केला असून त्यावर प्रत्येक तालुक्यात असलेले किरकोळ खतविक्रेते त्यांचाकडे उपलब्ध असलेला खतांचा स्टॉक एका क्लीकवर शेतक-यांना पाहता येतो. या अद्ययावत माहितीचा शेतक-यांना लाभ होत असल्याचे जिल्हा कृषि अधीक्षक संभाजीराव ठाकूर यांनी बोलतांना सांगितले.