विजय पाठक
जळगाव : सहलीला निघाल्यावर अथवा ग्रामीण भागातून प्रवास करतांना काही वेळा एखाद्या खराब रस्त्यावर टोकेरी दगड, काच अथवा अन्य एखाद्या कारणाने गाडीचे टायर पंक्चर होते. चाकातील हवेचा दाब कमी होतो. टायरचे एअर प्रेशर कमी होताच गाडी चालवणे कठीण होते. अशा वेळी अनोळखी जागेवर पंक्चर काढून टायर दुरुस्त करून घेणे ही एक मोठी कसरत असते. गाडी नियमित चालवणाऱ्या आणि लाँग ड्राइव्हवर जाणाऱ्या अनेकांना अशा प्रसंगाला कधी ना कधी सामोरे जावे लागते. या समस्येवर शहरातील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्षाचे विद्यार्थी ललित पाटील, सागर महाजन यांनी या समस्येवर उपाय शोधत स्वनिर्मित केलेल्या मॉडेलचे पेटंट प्रकाशित झाले आहे.
प्रामुख्याने खडबडीत रस्त्यावर दगड, काच, खिळा अशी एखाद्या टोकेरी किंवा धार असलेल्या वस्तूचा संपर्क झाल्याने टायर पंक्चर होते. पंक्चर टायर बदलून त्या जागेवर गाडीतील राखीव टायर जॅकच्या सहाय्याने लावणे हा पारंपरिक उपाय आहे. पण यात मोठ्या प्रमाणात श्रम घ्यावे लागतात तसेच हा प्रसंग एखाद्या महिलेवर किंवा वयोवृद्धावर ओढावल्यास त्यांची यावेळी मोठ्या प्रमाणात फजिती होते. या काळात प्रवासाच्या नियोजनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. पंक्चरची समस्या लवकर सोडवणे आवश्यक असते. पण वेळ कसा वाचवावा, हे समजत नाही. पण या चिंतेवर आता एक सोपा उपाय करणे शक्य झाले आहे.
बटन दाबताच कॉम्पॅक्ट जॅकवर तरंगेल कार
विद्यार्थ्यांनी ऑटोमोबाइलसाठी निर्मिती केलेले हे कॉम्पॅक्ट हायड्रॉलिक लिफ्ट यंत्रणा कारच्या चेसीसमध्ये फिट केले जाईल. हायड्रॉलिक जॅक ही एक प्रकारची भार उचलणारी यंत्रणा आहे, जी हायड्रॉलिक बलाने ऑपरेट केली जाते. या यंत्रणेत सिलिंडर व सेंटर पिन कॉम्पॅक्ट हायड्रॉलिकचा समावेश आहे. सेडान कार किंवा एसयूव्ही अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा शोध उपयुक्त ठरेल. या जॅक सिस्टमचे नियंत्रण ड्रायव्हर्सच्या केबिनमध्ये स्थित करण्यात येईल, चिखल किंवा खड्ड्यात अडकलेल्या कारला बाहेर खेचण्यासदेखील ही यंत्रणा पूर्णपणे मदत करेल. हा शोध कोणत्याही प्रकारच्या कारमध्ये सहजपणे अॅक्सेसरी म्हणून बसवता येणार आहे.
…अशी मिळाली प्रेरणा
या मागचा विशिष्ट हेतू सांगताना विद्यार्थी ललित पाटील, सागर महाजन म्हणाले की, त्यांनी एकदा एका अनोळखी रस्त्यावर एका वयोवृद्ध व्यक्तीला मोठ्या कसरतीने पंक्चर झालेल्या कारचे टायर बदलताना पाहिले. या वेळी त्याच्या भल्यामोठ्या कारचे पंक्चर झालेले टायर जॅकच्या सहाय्याने काढताना त्यांची होणारी दमछाक पाहून त्यांनी तातडीने त्यांना मदत करण्याचे ठरवले व टायर बदलून दिले. पण अशा परिस्थितीत या वयोवृद्ध व्यक्तीचे झालेले हाल पाहून विद्यार्थ्यांनी “ऑटोमॅटिक कॉम्पॅक्ट जॅक” असे उपकरण बनवण्याची योजना आखली जी कुठल्याही व्यक्तीचा स्मार्ट साथीदार बनून त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगातून त्यांना कमी वेळेत व कमी श्रमात यातून बाहेर काढेल व त्यांचा प्रवास सुखकर करेल. या अानुषंगाने त्यांनी आपली भावना मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक यांना बोलून दाखवली. त्यांचे मार्गदर्शन घेऊन सदर मॉडेल विकसित करत त्यांचे पेटंट दाखल केले. विद्यार्थ्यांनी नवनिर्मित केलेल्या ‘ऑटोमॅटिक कॉम्पॅक्ट जॅक’बद्दल रायसोनी इंस्टिट्युटचे संचालक प्रीतम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी या मॉडेलचे पेटंटधारक व महाविद्यालयातील विद्यार्थी ललित पाटील व सागर महाजन यांचे कौतुक केले.