Sunday, July 14, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गराणेसाहेबांवर बोलताना ध्यान ठेवावे, अन्यथा..; संजू परब यांचा केसरकरांना सज्जड इशारा

राणेसाहेबांवर बोलताना ध्यान ठेवावे, अन्यथा..; संजू परब यांचा केसरकरांना सज्जड इशारा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी काय बोलावे कोणावर बोलावे, हे सांगण्याइतपत आ. दीपक केसरकर यांची पात्रता नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माकडाच्या हाती कोलीत दिले असून ज्याप्रमाणे संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याने शिवसेना संपवली, त्याचप्रमाणे भविष्यात केसरकर शिंदे यांना महाग पडतील. स्वतःची साधी नगरपालिकाही दाखवू न शकलेल्या केसरकर यांनी यापुढे राणेसाहेबांवर बोलताना ध्यान ठेवावे, अन्यथा उरलेसुरले कपडेही उतरतील, असा सज्जड इशारा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी दिला.

दरम्यान, काहीही झाले तरी भविष्यात केसरकरांशी जुळवून घेणार नाही. युती असली तरीही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. नगरपालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढू, असेही संजू परब यांनी यावेळी स्पष्ट केले. ना. नारायण राणे यांच्याकडे जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, नगरपालिका व जिल्ह्यातील सर्व सत्ताकेंद्रं आहेत. मात्र स्वतःला जिल्ह्याचा नेता समजणाऱ्या केसरकर यांच्याकडे साधी शहरातील नगरपालिकाही नाही. त्यामुळे गल्लीतील नेते असलेल्या केसरकरांनी गल्लीतच बोलावे. बंडानंतर जिल्ह्यात परतलेल्या केसरकरांसोबत काल २० कार्यकर्तेही नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतःची औकात आधी तपासावी व नंतरच इतरांवर टीका करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

आ. केसरकर हे संधी साधू आहेत. राणेसाहेबांच्या जीवावर नगराध्यक्ष व त्यानंतर आमदार झालेल्या केसरकरांनी त्यांना सल्ला देण्याइतपत केसरकरांची राजकीय उंची नाही. केवळ चर्चेत राहण्यासाठी बोलबच्चन अमिताभ बच्चन, अशी केसरकर यांची पद्धत आहे. ज्या नेत्यांच्या मागे फिरून आमदारकीचे तिकीट मिळवले, त्यांच्यावर उलटणारे केसरकर शिंदेंचेच काय कोणाचेच होऊ शकत नाहीत. त्यामुळे केसरकरांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही आम्ही करणार आहोत, असे संजू परब यांनी यावेळी स्पष्ट केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -