Friday, October 11, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरसफाळेत पंधरा दिवसांपासून रेल्वेचे अधिकृत ‘पे अँड पार्किंग’ बंद

सफाळेत पंधरा दिवसांपासून रेल्वेचे अधिकृत ‘पे अँड पार्किंग’ बंद

सफाळे (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिम भागातील रेल्वेच्या अधिकृत असलेल्या दुचाकीच्या ‘पे अँड पार्किंग’चा ठेका ३० जून २०२२ रोजी संपुष्टात आल्याने मागील पंधरा दिवसांपासून ते बंद करण्यात आले आहे. पार्किंग बंद झाल्याने पश्चिम भागातील वाहनचालकांचे मोठे हाल झाले असून काही वाहनचालक रस्त्याच्या कडेला मिळेल त्या जागेत वाहने पार्क करून जात असल्याने दररोज सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात रेल्वे प्रशासनाने ऐबल इंटरपाईजेस या कंपनीच्या ठेकेदाराला दुचाकीसाठी ‘पे अँड पार्किंग’चा ठेका दिला होता. यामुळे पश्चिम भागातील माकणे, कांद्रेभुरे, विराथन खुर्द, मांडे, विठ्ठलवाडी, जलसार, विराथन बुद्रुक, टेंभीखोडावे आदी गावातील नोकरदार वर्गास दुचाकी पार्किंग करण्यास सुविधा निर्माण झाली होती. मात्र, या कंपनीने हे पार्किंग एका कंत्राटी कामगाराला चालवण्यासाठी दिले होते. हा इसम आपला मनमानी कारभार करून नियोजित जागेपेक्षाही अतिरिक्त जागेत गाड्यांची पार्किंग करत असल्याचा आरोप त्याच्यावर प्रवाशांकडून केला जात आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे टिकीट काढण्यापासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता.

३० जून रोजी या ठेकेदाराच्या पार्किंगचा ठेका संपुष्टात आल्याने तसेच अन्य कोणास पुन्हा ठेका दिला न गेल्याने पंधरा दिवसांपासून रेल्वेचे पे अँड पार्किंग बंद पडले आहे. पार्किंग बंद झाल्याने दुचाकी चालकांपुढे आपली वाहने कुठे पार्क करावी ही समस्या निर्माण झाली असून काही जण रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क करून नोकरीनिमित्त गुजरात तसेच मुंबई भागात जातात. यामुळे दररोज सकाळी व संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असून त्याचा ताण रेल्वेच्या फाटकावर देखील पडत आहे.

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवरून पुढील परवाना येईपर्यंत हे पे अँड पार्किंग बंद राहणार आहे. – चुंनीलाल अगलेसार, रेल्वे स्टेशन मास्तर, सफाळे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -