सफाळे (वार्ताहर) : महावितरणच्या सफाळे उपविभागीय क्षेत्रात पावसाच्या सुरुवातीपासूनच विजेचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून सफाळे पूर्व पश्चिम भागातील विविध गावापाड्यात दिवस – रात्र अनेक तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नोकरदारवर्ग, विद्यार्थी, व्यापारी, बँका तसेच विविध ऑनलाइन व्यवहार आदींना याचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षीच्या महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये बेहद संतापाचे वातावरण आहे.
सफाळे पूर्व-पश्चिम भागात ५० ते ६० गावपाडे असून शेती वाड्या, दुग्ध व्यवसाय, नोकरी आदींवर येथील नागरिकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. यंदाच्या वर्षी जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैपासून दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीच्या निगडित सर्व कामे सुरू झाली आहेत. तर दुसरीकडे पावसाच्या सुरुवातीपासून परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. पावसापूर्वीच्या दुरुस्ती कामात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून गंभीरतेने घेतले गेले नसून विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्ती बाबतही कमालीची हेळसांड झाल्याचेच दिसून येत आहे.
थोड्या प्रमाणातही पाऊस, अगर वारा वाहू लागल्यास त्वरित वीजपुरवठा खंडित होत आहे. रात्री अपरात्री तसेच दिवसाही वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह विद्यार्थी, व्यापारीवर्ग, बँकांचे व इतर ऑनलाइन व्यवहार, दवाखाने, शाळा, महाविद्यालये, लघु उद्योजक यांना मोठा फटका बसत असल्याने अतोनात नुकसान होत आहे. महावितरणच्या सफाळे विभागाचे स्टेशनजवळील कार्यालय काही वर्षांपूर्वी सरतोडी येथील सबस्टेशनजवळ स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे अवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याबाबतची तक्रार देण्यासाठी सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. बऱ्याचदा कार्यालयात फोन करून देखील संपर्क होत नसल्याने बऱ्याचदा अनेक गावापाड्यांमधील नागरिकांना अंधारात चाचपडत जगावे लागत आहे.
महावितरणच्या विभागाने या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे
कार्यालयामार्फत नेमलेल्या समन्वयकास वीजपुरवठा नादुरुस्तीबाबत कळविण्यात यावे, जेणेकरून फोन केल्यास तत्काळ ग्राहकांचे निरसन होऊ शकेल. सफाळे स्टेशन व आसपासच्या परिसरातील ग्राहकांना तक्रारी देण्याच्या दृष्टीने स्टेशन परिसरात तक्रार निवारण कक्ष स्थापन करून कर्मचारी नेमण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची नितांत आवश्यकता आहे. परिसरातील वाहतुकीच्या रस्त्यावर आणि काही ठिकाणी मुख्य विद्युत वाहिन्या जुन्या झाल्या असून त्या केव्हाही तुटून पडतात. पावसाचे दिवस असून अशा अपघातामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याने त्यावर योग्य उपाययोजना करावी. रात्री-अपरात्री खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत गंभीरतेने घेऊन त्वरित विविध ठिकाणची वीज उपकरणे आणि विद्युत वाहिन्यांची तपासणी करून त्यावर योग्य कार्यवाही करावी, असे स्थानिकांनी सांगितले.
उन्हाळ्यात चिनी मातीचे इन्सुलेटर तडकले जातात. त्यावर पावसाचे पाणी पडून त्यांचा स्फोट होणे, वादळी वाऱ्यात वीजवाहिनीवर झाड पडणे अशा नैसर्गिक आपत्तींमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या तोडणे, रोहित्रांची तपासणी करणे, गंजलेले खांब, विद्युत वाहिन्या व उपकरणांची तपासणी करणे आदी विविध कामे करण्यात आली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे विजेचे पोल पडण्याच्या नैसर्गिक घटना घडत असल्याने बऱ्याचदा काही काळ वीजपुरवठा खंडित ठेवावा लागला होता. – अनिरुद्ध बैतुले, उपकार्यकारी अभियंता, महावितरण सफाळे