संततधार स्वरूपातील मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. वरुणराजाचे आगमन काही अंशी उशिराने झाले असले तरी बॅकलॉग भरून काढण्याच्या निर्धाराने वरुणराजा इमानेइतबारे महाराष्ट्राच्या शहरी भागासह ग्रामीण भागही ओलाचिंब करत आहे. वरुणराजाच्या जोरदार सतर्कतेमुळे शहरी भागातील शाळांना सुट्टी देण्याची वेळ आली आहे. नेहमीप्रमाणे पावसाचा बस, रेल्वे व अन्य प्रवासी सेवेवर परिणाम झालेला आहे. मुंबई शहर व उपनगरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या असल्या तरी मुंबईची तुंबई या वर्षी झालेली नाही. मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट असून आयुक्त कारभार चालवित आहेत. त्यामुळे प्रशासनाची प्रशंसा करावी तितकी कमीच आहेच. पूर्वी ज्या ज्या ठिकाणी पाणी साचून राहायचे, वाहतूक कोंडी व्हायची, तिथे तसे चित्र आतापर्यंत निर्माण झालेले नाही. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालिका प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे मुंबई तुंबईमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र फारसा बदल झालेला दिसून येत नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्याच्या कृषी क्षेत्राच्या अर्थकारणाचा कणा मानले जात आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोवा, कर्नाटक, बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आदी राज्यांतील कृषी क्षेत्रावरही या बाजार समित्यांमधील उलाढालींचा परिणाम होत आहे. या बाजार समितीमध्ये राजाच्या कानाकोपऱ्यांतून कृषी मालाची विक्रीसाठी आवक होत असते. राज्यातील ३०६ तालुकास्तरीय बाजार समित्यांचा कारभार नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अर्थकारणावर अवलंबून असतो. अन्य राज्यातील कृषी मालही या बाजार समिती आवारात विक्रीला येत असतो. या बाजार समिती आवारात भाजी मार्केट, फळ मार्केट, कांदा-बटाटा मार्केट, किराणा दुकान मार्केट, धान्य मार्केट अशा पाच मार्केटचा समावेश होत असून बाजार समितीचे मुख्यालय कांदा-बटाटा मार्केट आवारात आहे. उर्वरित चारही मार्केटमध्ये बाजार समितीची कार्यालये असून उपसचिव व अन्य अधिकारी येथे असतात. दररोज लाखो रुपयांच्या अर्थकारणाची उलाढाल होणाऱ्या बाजार समिती आवारातील घटकांना पावसाळ्यात नरकयातना सहन कराव्या लागतात.
दर वर्षी हे चित्र असतानाही यात बदल करण्यासाठी, येथील समस्या सोडविण्यासाठी, सुविधा पुरविण्यासाठी बाजार समिती प्रशासनाला सुबुद्धी सुचू नये हे खरोखरीच बाजार समिती आवारात वावरणाऱ्या घटकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. समिती आवारात समितीचे कर्मचारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, माथाडी, मापाडी, मेहता, वारणार, किरकोळ खरेदीदार, वाहतूकदार, पालवाल महिला, ग्राहक अशा स्वरूपात पाचही मार्केट आवारात दररोज लाखो लोकांची वर्दळ असते. पावसाळा कालावधीत बाजार समिती आवारातील मार्केटमध्ये कचरा अडकलेला, पाणी तुंबलेले पाहावयास मिळते. कचऱ्याचे ढिगारे, साचलेल्या पाण्यात विखुरलेला नासका व खराब झालेला कृषी माल, त्याची सुटलेली दुर्गंधी आणि
त्यातून पसरणारे साथीचे आजार यामुळे पावसाळा कालावधीत बाजार समिती आवारातील जीवितांच्या घटकांवर मृत्यूची टांगती तलवार कायम असते.
दर वर्षी पावसाळ्यात बाजार समिती आवारात साथीच्या आजाराचा उद्रेक होत असतो. बाजार समिती आवारातील व्यापारी व अन्य घटकांचा यापूर्वी मलेरिया, डेंग्यू व अन्य साथीच्या आजारांनी मृत्यू झालेला आहे. धान्य मार्केट व किराणा दुकान मार्केटच्या तुलनेत भाजी, फळ व कांदा-बटाटा या कृषी क्षेत्राशी संबंधित मार्केटमध्ये साथीच्या आजारांचे रुग्ण पावसाळा कालावधीत अधिक संख्येने पाहावयास मिळतात. नवी मुंबई महापालिकेने कांदा-बटाटा मार्केट धोकादायक घोषित करण्याच्या घटनेला जवळपास दोन दशकांचा कालावधी लोटला आहे. तथापि, व्यापारी संघटना व व्यापारी यांच्यातील वादामुळे आजतागायत कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी रखडलेली आहे. या मार्केटमध्ये स्लॅब पडझडीच्या दुर्घटना नेहमीच घडत असतात. दोन दिवसांपूर्वी या मार्केटमधील लिलावगृहामध्ये पडझडीची घटना घडलेली आहे. या मार्केटमध्ये वावरणाऱ्या प्रत्येक घटकाच्या जीविताला मार्केटमध्ये वावरताना धोका कायम आहे. पाचही मार्केटच्या आवारातून बाजार समिती प्रशासनाला सेसच्या माध्यमातून कोट्यवधींचे उत्पन्न दर महिन्याला मिळत असतानाही पावसाळ्यातील चित्र बदलण्यास बाजार समिती प्रशासन तयार नाही. भाजी मार्केटमधील व्यवहार पहाटे तीनपासून सुरू होतात, सकाळी अकरा वाजेपर्यंत या मार्केटचा कारभार संपलेला असतो. गाळ्याच्या सभोवताली साचलेले पाणी, त्यात विक्रीस ठेवलेला भाजीमाल व गाळ्यातून खाली उतरल्यावर गुडघ्याहून अधिक उंच साचलेल्या पाण्यातून या भाजीमाल बाजार आवाराबाहेर घेऊन जाण्यासाठी माथाडी व किरकोळ खरेदीदारांना करावी लागणारी तारेवरची कसरत हे चित्रच भयावह आहे. त्यात अनेकदा पाण्यात घसरून भाजीमाल पडणे, माथाडी आणि किरकोळ खरेदीदारांना दुखापती होणे हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. अनेकदा भाजी ज्या पाण्यात पडते, त्यात गटाराचे पाणी व अन्य सांडपाणीमिश्रित झालेले असते. किरकोळ खरेदीदारांकडून तीच भाजी मुंबई, नवी मुंबई व अन्यत्र विकली जाते. म्हणजेच भाजी खाणाऱ्यांच्याही जीवाला धोका ठरलेला असतो. अनेक ठिकाणी रस्त्यांचीही दुरवस्था झालेली आहे. भाजी मार्केट व्यापाऱ्यांना कमी पडू लागल्याने २८५ गाळ्यांचे अतिरिक्त मार्केट बांधण्यात आले. सुरुवातीच्या २-३ महिन्यांचा अपवाद वगळता येथे भाजी व्यापार झालाच नाही, गोडाऊनचे स्वरूप त्या मार्केटला आले आहे. गाळे भाड्याने देण्यात आले असून तेथेही दुसराच व्यापार सुरू आहे. समिती आवारातील काही भागांत थोडा पाऊस वाढला तरी तेथे तरण तलावाचे स्वरूप येते. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा कणा असणाऱ्या बाजार समितीची दुरवस्था संपणार कधी?, असा संताप बाजार आवारातील घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.