Sunday, July 14, 2024
Homeमहामुंबईआपत्कालीन परिस्थितीत लोकल प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करा; पालिका आयुक्तांचे निर्देश

आपत्कालीन परिस्थितीत लोकल प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करा; पालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : गेले काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच मुंबईला ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे मुंबईत जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर काय उपाययोजना कराव्यात? यासाठी बैठक घेतली असून संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. मुंबईत जोरदार पाऊस झाल्यानंतर आधी लोकल सेवा विस्कळीत होते. अशा वेळी प्रवाशांना आवश्यक ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी एसटी व बेस्ट बसेसची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी यावेळी दिले.

आपत्कालीन व्यवस्थापनविषयक बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार हे विशेषत्वाने उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, संबंधित खाते प्रमुख यांच्यासह बेस्ट उपक्रम, मध्य व पश्चिम रेल्वे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) इत्यादी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकी दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने लोकल ट्रेन, धोकादायक इमारती, पावसाळ्यातील खड्डे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लोकल ट्रेन बंद असल्यास प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्राथमिक वैद्यकीय उपचार व इतर आवश्यक मदत देण्यासाठी नियोजन करण्याचेही निर्देश दिले असून लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास अशावेळी प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासह आवश्यक ती मदत योग्य प्रकारे मिळावी, या दृष्टीने मुंबई पालिकेच्या विभागांनी त्यांच्या स्तरावर रंगीत तालीम आयोजित करण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश दिले आहेत.

ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी उपाययोजना

मुंबईत जोरदार पाऊस झाल्यानंतर आधी लोकल सेवा विस्कळीत होते. अशा वेळी प्रवाशांना आवश्यक ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी एसटी व बेस्ट बसेसची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. संभाव्य प्रसंगी नागरिकांच्या सुविधेसाठी ४०० जादा बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडण्याची बेस्टची तयारी, तर ११ जादा बसेस सोडण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. दरम्यान अशा परिस्थितीत समन्वय साधण्यासाठी मुंबई पालिकेच्या २४ विभागांच्या स्तरावर आणि इतर संबंधित संस्थांच्या स्तरावर समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी यापूर्वी दिले होते. त्यानुसारी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे देण्यात आली आहे.

‘तक्रारी आल्यावर २४ तासांत खड्डे भरा’

पावसाळ्यात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात होते. मात्र खड्ड्यांच्या तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा कालावधी ४८ तासांपेक्षा अधिक असू नये, यासाठी काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पावसाळ्यादरम्यान खड्डे भरताना प्राधान्याने ‘कोल्डमिक्स’ साहित्य वापरले जाते. मात्र पावसाळ्यादरम्यान पाऊस नसेल त्या दिवशी अन्य प्रकारचे साहित्य निर्धारित पद्धतीनुसार उपयोगात आणावे व पालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची नियमितपणे पाहणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था करा

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांनी ही इमारत रिकामी करावी, यासाठी मुंबई पालिकेद्वारे सातत्याने विनंती व आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही व कारवाई देखील नियमितपणे करण्यात येत आहे. तर अति धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था मुंबई पालिकेच्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत करण्याचे निर्देश दिले असून सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्राचे संबंधित खासदार व आमदार यांच्याशी नियमितपणे संपर्क साधण्याचे निर्देश बैठकीत दिले. धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांनी ही इमारत रिकामी करावी, यासाठी पालिकेद्वारे विनंती करण्यात येते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -