Sunday, October 26, 2025
Happy Diwali

जॅकलिन 'कशी' अडकली ईडीच्या जाळ्यात?

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझच्या ईडीच्या जाळ्यात सापडली आहे. तिच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जॅकलीनचा ईडीकडून पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. तिला भारत सोडून दुसऱ्या कोणत्याही देशात जाण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. जॅकलीनला तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी जायचे होते. मात्र तिचा तो अर्जही फेटाळण्यात आला होता. आता तर ईडी जॅकलीनवर दोषारोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात जॅकलीनवर कोणती कारवाई होणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

जॅकलीनवर असा आरोप करण्यात आला आहे की, तिने सुकेश चंद्रशेखरकडून कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट घेतले होते. एवढेच नव्हे तर सुकेशने जॅकलीनच्या आई वडिलांना देखील महागडे गिफ्टस दिल्याचे ईडीच्या चौकशीतून दिसून आले आहे. सुकेशवर ईडीची बारकाईने नजर आहे. त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी आता जॅकलीनच्या विरोधात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जॅकलीनच्या अडचणीत वाढ होणार आहे.

जॅकलीनच्या विरोधात अनेक पुरावे ईडीला मिळाले आहेत. यापूर्वी ईडीने जॅकलीनकडे केलेल्या चौकशीतून काही गोष्टी समोर आल्या होत्या. जॅकलीनची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. हे प्रकरण दोनशे कोटींचा अपहार केल्याचे आहे. त्याची लिंक तिहार जेलशी संबंधित आहे. सुकेश चंद्रशेखर त्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत असून त्या सुकेशने जॅकलीनला महागडे गिफ्टस दिले होते. अपहार करण्यात आलेले पैसे हे विदेशात पाठवण्यात आले आहेत. त्यात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.

सोशल मीडियावर जॅकलीन आणि सुकेश चंद्रशेखर यांचे काही फोटो व्हायरल झाले होते. जॅकलीनने तिच्या चौकशीत एका पार्टीमध्ये सुकेशची ओळख झाल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात ते अनेकदा भेटल्याचे ईडीच्या सुत्रांनी सांगितले. याप्रकरणाशी संबंधित अनेकांकडे ईडी चौकशी करत असून त्यानंतर जॅकलीनच्या विरोधात चार्जशीट तयार केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment