वसई किल्ला संवर्धनाकरता लोकसहभागाची गरज
विरार (प्रतिनिधी) : मागील आठवडाभर कोसळत असलेल्या पावसाचा फटका वसईकरांचा अभिमान असलेल्या ‘जंजिरे वसई किल्ल्या’लाही बसला आहे. समुद्राला आलेल्या उधाणामुळे प्लास्टिक कचरा किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचला आहे. परिणामी किल्ल्याला पुन्हा एकदा बकाल स्वरूप येणार असल्याची चिंता दुर्गप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नरवीर चिमाची आप्पा यांच्या शौर्यगाथेने पावन झालेल्या जंजिरे किल्ले वसईच्या संवर्धन व संरक्षणाकरता लोकसहभागाची गरज व्यक्त केली जात आहे. तब्बल ११० एकर जागेत पसरलेल्या या किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेलेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला आहे. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा झाली आहे. किल्ल्यातील प्राचीन इमारतींची पडझड होत आहे. त्यात आता उधाणाच्या पाण्याबरोबर येणारा प्लास्टिक कचरा ही मोठी समस्या बनली आहे. या किल्ल्याच्या दिंडी प्रवेशद्वारावर मागील आठवाडाभरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचला आहे.
तीन बाजूंनी समुद्र व दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर होती. किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत.
किल्ल्याच्या आतील भागात दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे. या किल्ल्याची सातत्याने पडझड होत आहे. मागील आठवड्यात वसई किल्ल्यातील ऐतिहासिक डॉमनिकन मठाच्या मुख्य द्वाराच्या वर असलेल्या राजचिन्हावरील कोरीवकाम केलेला भाग कोसळून पडला होता. याआधीही काही वास्तूंची अशीच पडझड झालेली आहे.वसई किल्ल्यातील ८ एकर जागा केंद्र सरकारने वसई-विरार महापालिकेला सुपूर्द केलेली आहे. या जागेत चिमाजी आप्पा यांचे स्मारक असून; या परिसरातील उत्खननात सापडणाऱ्या वस्तूंचे म्युझियम उभारावे, दर शनिवार-रविवारी या ठिकाणी लाइट आणि साउंड शो आयोजित करावा, किल्ले वसईत येणाऱ्या पर्यटकांकरता पाण्याची व्यवस्था करावी, असा प्रस्ताव ‘आमची वसई` या सामाजिक संस्थेने पालिकेपुढे ठेवला होता.
विशेष म्हणजे वसई-विरार महापालिकेने २०२१-२२च्या अर्थसंकल्पात वसई किल्ले संवर्धनासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र कोविडच्या संक्रमणामुळे ही रक्कम खर्च करता आलेली नाही, असे पालिकेचे म्हणणे आहे. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातही वसई किल्ले संवर्धनासाठीची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. केवळ कागदावर दाखवू नये; तर ही रक्कम खर्च करण्यात यावी, अशी अपेक्षा इतिहासप्रेमी नागरिकांनी केली आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे, या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून, भिंती, बुरूज, तट यांची साफसफाई करून, जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून, पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधायचे असेल आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपायचा असेल तर सरकार, पुरातत्त्व विभाग यांच्यासह सामाजिक संस्था व लोकसहभागाची ठळक गरज आहे. -अमर म्हात्रे, दुर्गप्रेमी.