डोंबिवली (वार्ताहर) : डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीमधील ५०० घरांचा गेल्या दीड महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद होता. अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे येथील रहिवाशांनी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे रहिवाशांकडून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पाण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला. सदर पाठपुराव्याला यश आले असून येथील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.
एकीकडे बाहेर मुसळधार पाऊस मात्र नळाला पाणी नाही, अशी अवस्था डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीवासीयांची झाली होती. पावसाळ्यात घराच्या छतावरून खाली पडणारे पाणी भरण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली होती. दीड महिना पाणीपुरवठा बंद असल्याने रहिवाशांनी पालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. मात्र झोपडपट्टी असल्याने आपल्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप करत येथील रहिवाशांनी पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती.
या प्रकरणी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष कांबळे आणि पदाधिकारी राजू शेख यांनी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी तांत्रिक बिघाड असून पाण्याच्या पाइपलाइनमध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान या पाचशे कुटुंबीयांचा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भाजपकडून देण्यात आला. भाजपच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचे गांभीर्य ओळखून पालिकेने पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. भाजपच्या या प्रयत्नाने ५०० कुटुंबीयांचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी आभार मानले, तर याबाबत भाजप पदाधिकारी शेख म्हणाले की, पालिका प्रशासन झोपडपट्टीवासीयांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात. पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.
मात्र दीड महिना या कुटुंबीयांना पाणी मिळत नसेल, तर त्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर ही समस्या सोडवणे आवश्यक होते. पालिकेने लक्ष दिले नाही म्हणून नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी भाजपला पाठपुरवठा करावा लागला. येथील नागरिकांचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने आम्हीही समाधानी असल्याचे सांगितले.