रोहा (वार्ताहर) : पावसाने उशिरा प्रारंभ केल्याने डबक्यात साठलेल्या सांडपाण्यात डेंग्यूच्या आळ्या अधिक प्रभावी ठरल्या. अखेर अपेक्षेप्रमाणे वरसेत अनेकांना डेंग्यूने घेरले. त्यात डेंग्यूच्या साथीची अधिकच भर पडल्याने जाधव नर्सिंग होम यांसह अनेक दवाखाने फुल्ल भरल्याचे गंभीर चित्र समोर आले. डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात वरसे, तालुका आरोग्य प्रशासन अक्षरशः अपयशी ठरले. डेंग्यूत वरसे आघाडीवर राहिल्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोरानंतर पुन्हा चांगल्याच झोपा काढल्याचे अधोरेखित झाले.
रोहा तालुक्यात साथीच्या आजारात मोठी वाढ झाली. असंख्य लहान मुलेही आजारी पडल्याचे समोर आले. त्यात डेंग्यूने डोके वर काढल्याने आरोग्य प्रशासन आतातरी गांभीर्याने उपायोजना करेल का? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, वरसेतील अनेक इमारतींच्या बांधकाम डबक्यांत डासांच्या मोठ्या प्रमाणात आळ्या आढळल्याने प्रशासन सतर्क झाल्याचे दाखवत असले तरी फवारणी व अन्य उपाययोजनेकडे गांभीर्याने पाहत असल्याचे दिसत नाही, तर डेंग्यूंच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तालुका आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
वरसे ग्रामपंचायतमधील भुवनेश्वर, आदर्शनगर, गणेशनगर, वरसे विभागात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने एकच खळबळ उडाली. गणेशनगर परिसरातील इमारतीच्या आवारात विविध बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या डबक्यात डासांच्या आळ्या आढळून आल्या. याच परिसरातील नागरिक, लहान मुलांना डेंग्यूने घेरल्याचे अनेकदा समोर आले. अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागले. आता लहान मुलांना डेंग्यू सदृश्य तापाची लक्षणे दिसत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
वाढत्या डेंग्यूच्या प्रादुर्भावाने तालुका आरोग्य विभागाने डासक्षेत्राची पाहणी केली. त्यात बांधकाम चालू असलेल्या रामचंद्र रेसीडेन्सी, सुरेख जैन, अहिरे, धोत्रे शेळके, पवार बिल्डिंग बांधकामाच्या ठिकाणी डासांचे अनेक पॉझिटीव्ह कंटेनर सापडले. भुवनेश्वर वरसेतील इमारतीच्या अनेक बांधकामांच्या ठिकाणी डासांच्या आळ्या सापडल्याने ग्रामपंचायत व तालुका आरोग्य प्रशासन आताही किती गंभीर आहे, हे अद्याप तरी समोर आलेले नाही.\
वरसेतील वाढत्या डेंग्यूंच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य प्रशासनाने ग्रामपंचायतीला नोटीस बजावली. वरसे व भुवनेश्वर येथील संशयित डेंग्यू रुग्ण खासगी दवाखान्यात आढळून येत आहेत. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी यांनी सर्वेक्षण केले. वरसे कार्यक्षेत्रातील बांधकाम व्यवसाय ठिकाणी डासांच्या आळ्या मोठ्या प्रमाणात आढळून आळ्या. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनीया इत्यादी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव करणारे डास आढळून आल्याने तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केल्या.
नालेसफाई करणे, अळीनाशक फवारणी, धूरफवारणी कराव्यात, त्वरित उपाययोजना न केल्यास परिसरात डेंग्यू, चिकुनगुनिया साथ प्रभावी पसरू शकते. मृत्यू होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही असा इशारा आरोग्य विभागाने दिल्याने ग्रामपंचायत प्रशासन अधिक सतर्क होण्याची अपेक्षा व्यक्त झाली. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. अजय ससाणे यांनी आठवड्यात साथीचे अनेक रुग्ण सापडत असल्याचे सांगत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले. फवारणी, डबक्यांत अळीनाशक फवारणी, त्यात पेस्ट्रो फवारणी करण्याची उपयोजना सुरू केल्याची माहिती ग्रामसेवक अशोक गुट्टे यांनी दिली. दरम्यान, वरसेस डेंग्यू व अन्य आजाराच्या वाढत्या साथीने सर्वच प्रशासनाचा पुरता फज्जा उडाला.