पिंगुळी हे छोटेसे गाव कुडाळपासून जवळच असून त्याचे क्षेत्रफळ ७ कि.मी. लांबी व रूंदी ८ कि.मी. आहे; परंतु हे गाव छोटे असले तरी सामाजिक व लौकिक अर्थाने या छोट्या गावाला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे. फार वर्षांपासून हे गाव कळसूत्री बाहुल्यांच्या खेळासाठी देशात-विदेशात प्रसिद्ध होतेच; परंतु श्री समर्थ सद्गुरू राऊळ महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या गावचे ग्रामदैवत आहे देव रवळनाथ. इतरही देवळे आहेत. श्री दत्तात्रयाचे मंदिर, राऊळ महाराजांची समाधी मंदिर, माय-माऊलीचे मंदिर अशा प्रकारची खूप देवळे या ठिकाणी आहेत, परंतु कुठल्याही गावचे कुलदैवत किंवा ग्रामदैवत यालाच जास्त महत्त्व दिले जाते. ग्रामदैवत म्हणजे संपूर्ण गावचे व तेथील रहिवाश्यांचे रक्षण करणारी देवता. अशा या ग्रामदेवतेच्या मंदिराची, तेथील सुखसोयींची व्यवस्था राखणे हे खरे म्हणजे ग्रामस्थांचीच जबाबदारी असते आणि पंच महाजन यांच्यामार्फत गावकऱ्यांच्या सहकार्याने या देवतेची व मंदिराची नीट व्यवस्था ठेवली जाते. पिंगुळी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ आहे आणि आजपर्यंत तो ताठ मानेने गावचे योग्य तऱ्हेने रक्षण व पालन करीत आहे. सध्या पिंगुळी गावची खूपच सुधारणा झाली आहे व यापुढेही होतच राहील, यात शंकाच नाही; परंतु सन १९७२ पूर्वी या देवळात विजेची सोय केलेली नव्हती आणि तिथे वीज घ्यावी म्हणून फारच प्रयत्न चालले होते. मध्यंतरी श्री राऊळ महाराजांनी देवळाची अवस्था पाहून तिथे सुधारणा करण्याच्या हेतूने पाऊले उचलली.
पूर्वी देव रवळनाथाची मूर्ती आसनस्थ नव्हती, तर ती ग्रामस्थांनी स्वत:च्या तंट्या-बखोट्यापायी किंवा स्वार्थापायी ती मूर्ती खाली पाडली होती; परंतु प. पू. राऊळ महाराजांनी स्वहस्ते एकट्यानेच ती देव रवळनाथाची मूर्ती उभी केली व त्या मूर्तीची (देवतेची) पुन: प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा करून घेतली. सांगायचा मुद्दा हाच की, गावकऱ्यांच्या वैयक्तिक भांडणांमुळे देवांना तोंडघशी पडावे लागले. पण प. पू. राऊळ महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्या मूर्तीत सजीवपणा आला व सर्व गावकऱ्यांशी समाधानाचा सुस्कारा सोडला; परंतु आता विजेचे काय? असाच प्रश्न सर्वांना पडला. प. पू. राऊळ महाराजसुद्धा देवळात वीज नाही म्हणून नाराज होते. पण शेवटी ते एक दिवस अण्णांना म्हणाले, ‘देवळात वीज पाहिजे होती. त्याप्रमाणे मी खूप प्रयत्न चालविले; परंतु कोणीच ऐकायला तयार नव्हते. तरीसुद्धा मला प. पू. राऊळ महाराजांबद्दल, दैवी सामर्थ्याबद्दल पूर्ण खात्री होती. आपले काम महाराजच करून घेतील. याची मनापासून खात्री होती. अचानक एके दिवशी वीज खात्यातील एक अधिकारी महाराजांना भेटण्यासाठी आले. त्यांचे काहीतरी काम होते आणि ते काम व्हावे म्हणून ते महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठीच आले होते; परंतु त्या दिवशी महाराज पिंगुळीत नव्हते. अण्णा मात्र होते.
काही लोकांनी त्या अधिकाऱ्याला सांगितले, तुमचे जे काही काम असेल ते अण्णांना सांगा, ते तुमचे काम करून देतील. त्याप्रमाणे तो अधिकारी मला भेटला. मी त्यांना सांगितले की तुम्ही घाबरू नका. तुमचे काम नक्की होणार आणि त्याप्रमाणे त्या अधिकाऱ्याचे जे काय काम व्हायचे होते ते त्यांच्या मनाप्रमाणे झाले. त्यानंतर मी त्या अधिकाऱ्याकडे वीजेच्या कामाबद्दल बोललो. तेव्हा त्या अधिकाऱ्याने कसलीही कुरकुर न करता अण्णांना पाहिजे तशी वीज मिळवून दिली. देवळात वीज आली म्हणून सर्वांना फारच आनंद झाला. वीज देवळात घेतल्यानंतर वीज उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला व तोसुद्धा त्या अधिकाऱ्याच्या हातानेच. त्यांचे नाव होते, ‘मोमीन साहेब’. अशा तऱ्हेने प. पू. बाबांच्या आशीर्वादाने व श्री देव रवळनाथाच्या कृपेने मंदिरात विज आली. त्यावेळी सर्व लोक आनंदाने बेभान झाले व अतिआनंदाने याउत्सवाला कार्यक्रमाला नाचून-गाऊन आपला आनंद व्यक्त केला. पिंगुळीला जणू पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते. पिंगुळी म्हणजे प्रति पंढरपूर बनले होते.
या सोहळ्यात वायमन गार्डनचे लिनसे साहेब, मॅनेजर मार्टिन साहेब, वीज अधिकारी मोमीन साहेब, ग्रामस्थ मंडळी तसेच श्री भालचंद्र महाराज व श्री राऊळ महाराज यांनी सक्रिय भाग घेतला होता व अति उत्साहात बेभान अवस्थेतच या सोहळ्याचा समारोप झाला. महाराजांनी आपल्या दैवी सामर्थ्यांची प्रचिती सर्व लोकांना दाखवून दिली. धन्य ते राऊळ महाराज ज्यांनी भक्तांची कामे करून देण्यासाठी स्वत: दैवी सामर्थ्यांची जोड दिली.
– समर्थ राऊळ महाराज