मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पाचवी आणि आठवीच्या परीक्षेला जे ग्रहण लागले आहे ते मात्र जाण्यास तयार होत नसल्याचे चित्र आहे, कोरोना महामारी नियंत्रणात आल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते, सर्व तयारीदेखील झाली होती. मात्र राज्यात अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा वेळापत्रक कोलमडले.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे २० जुलैला होणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ही परीक्षा आता ३१ जुलैला घेण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, २० जुलैच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रच ३१ जुलैच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातील ४८ हजार ८० शाळांमधील पाचवी व आठवीच्या एकूण सात लाख २१ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने दळण-वळणास येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता शिष्यवृत्ती परीक्षा २० ऐवजी ३१ जुलै (रविवार) घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेकडून कळविण्यात आले आहे. शिक्षण विभागाने सर्व तयारी केली होती; परंतु काही ठिकाणी पावसामुळे संपर्क ही करणे कठीण असल्याने आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आला आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.