Friday, October 4, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यबटर... बटर... कोणते? किती?

बटर… बटर… कोणते? किती?

अंजली पोतदार

तब्बल दोन वर्षानंतर प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाइन शाळा सुरू झाल्या. तमाम आई वर्गाला मुलांना डब्यात काय द्यायचा? हा प्रश्न सतावू लागला. कितीही नवे पदार्थ शोधले तरी हक्काचे म्हणजे ब्रेड बटर. पटकन देता येण्यासारखे, मुलांना आवडणारे आणि पोटभरीचेसुद्धा. त्यामुळे लोकप्रिय डबा. नुसता डबाच नाहीम तर तमाम हॉटेलातील लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हणजे पाव भाजी. या पावभाजीचा आपण बटरच्या शिवाय विचारच करू शकत नाही. याशिवाय ब्रेडच्या अन्य अनेक खाद्यपदार्थांत बटरला मुख्य स्थान असते. अशा या बटरची आजच्या लेखात अधिक माहिती घेऊ या…

बटरचे दोन प्रकार असतात. टेबलं बटर आणि व्हाइट बटर. टेबलं बटर हे दुधाला विरजण लावून, दही लावून लोणी काढून त्यात मीठ, परमीटेड खाद्यरंग, (annatto किंवा कॅरोटिन) आणि dyacetyle हा स्वादासाठी एजन्ट घालून तयार करतात, तर व्हाइट बटरमध्ये यातील काहीही घालत नाहीत.

सहसा ग्राहक कोणतेही उत्पादन अथवा सेवा निवडताना जाहिराती किंवा कोणीतरी सांगितले म्हणून निवडतात. पण काही सजग ग्राहक हे त्या उत्पादनांच्या अथवा सेवांच्या माहितीच्या खोलात शिरतात. त्यांचे घटक पदार्थ, किंमत, वजन, वापरण्यास योग्य मुदत, एका वेळी खाण्याचे प्रमाण इत्यादी गोष्टी FSSAIच्या प्रमाणानुसार आहेत किंवा नाहीत याची डोळसपणे तपासणी करून मगच खरेदी करतात.

काही कामानिमित्ताने ग्राहक व्यवहार मंत्रालयाची वेबसाइट बघताना एक नवी माहिती कळली. ग्राहक व्यवहार मंत्रालय हे विविध ग्राहक संघटनांना ग्राहकोपयोगी उत्पदनांच्या आणि सेवांच्या तुलनात्मक परीक्षणासाठी अर्थसाहाय्य्य देऊ करते. त्यामुळे ग्राहकांना एकाच उत्पादनांच्या विविध ब्रँड्सची तुलना करणे सोपे जाते. कोणती
उत्पादने व सेवा खरेदी करायची ते सजगपणे ठरवता येते. जेणेकरून ग्राहक कायद्याने ग्राहकाला दिलेल्या ६ हक्कांपैकी निवडीचा हक्क अधिक प्रभावीपणे वापरता येतो.

ही परीक्षणे त्या त्या ग्राहकसंस्थांनी केलेल्या प्रयोगशाळेतील प्रयोगांच्या निरीक्षणांवर आधारित असतात. ग्राहक संस्था किंवा NGOनी केलेल्या चाचण्या या NABL लॅब (नॅशनल एक्रिडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरी) मधेच करून घेतल्या जातात. त्यामुळे त्या चाचण्यांना अधिकृत मानता येते, कारण NABL म्हणजे राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त परीक्षण प्रयोगशाळा.

ग्राहक संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणाची माहिती ग्राहक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असते. आज आपण रोजच्या वापरातील बटर या उत्पादनाच्या ७ विविध ब्रँड्सचे २०२१ या वर्षात केलेले परीक्षण, त्याचे निकष आणि निकाल यावर माहिती घेऊ या.

बटर हा एक व्हिटॅमिन A चा उत्तम स्रोत आहे.तसेच थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन Dही यातून मिळते. पण खूप बटर खाणे हे त्यातील जवळ जवळ ८०% असलेल्या फॅट किंवा स्निग्ध पदार्थामुळे आरोग्यदृष्ट्या योग्य नसतं सोबत दाखवलेल्या तक्त्यांनुसार FSSAI आणि BIS प्रमाणानुसार बटरमधील घटकांचे प्रमाण

दुग्धजन्य स्निग्धांश –

कमीतकमी ८०% पाणी – जास्तीत जास्त १२ ते १६ %
SNF – २% (लॅक्टोस प्रथिन)पेक्षा जास्त
असू नये. मीठ – २% ७४० kcal /१०० ग्रॅम पोषणमूल्य असलेले बटर हा एक पचनास जड पदार्थ आहे.

या निकषांशिवाय भेसळ, वास आणि चव, किंमत, सूक्ष्म जिवाणूंची निर्मिती, खाण्यास योग्य ती मुदत हे निकषही तपासले जातात.
बटरचे पॅकेजिंग हे नेहमी बटर पेपरमध्ये करून ते पुन्हा जाड कागदी बॉक्समध्ये पॅक केलेले असले पाहिजे. तसेच बटरचे वजन हे वैध वजनमाप कार्यालयाने प्रमाणित केल्यानुसारच असले पाहिजे.

व्हाइट बटर आणि मार्गरिन हे जरी पदार्थ सारखेच वाटत असले तरी बटरमध्ये संपृक्त स्निग्ध पदार्थ असतात, तर मार्गरिनमध्ये असंपृक्त स्निग्ध पदार्थ असतात म्हणून मार्गरिनच्या ऐवजी नेहमी व्हाइट बटरचा आग्रह धरावा. ट्रान्स फॅट फ्री मार्गरिन त्यातल्या त्यात बरे असते.

या लेखात तुलना केलेल्या उत्पादनातील ७ विविध ब्रँड्सपैकी सर्वच ब्रँड्स राष्ट्रीय पातळीवर ठरवलेल्या निकषांनुसार आढळून आले. तरीही ‘वरका’ हा ब्रँड सर्वात वरच्या स्थानावर असून त्यापाठोपाठ ‘पतंजली’ आणि त्यानंतर ‘प्रेसिडेंट’ या ब्रँडचा क्रमांक लागतो. अमूल या ब्रँडमध्ये मिठाचे प्रमाण जास्ती आहे, तर रंग आणि गंध यात हा ब्रँड सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. ही सर्व माहिती या लेखात दिलेल्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ही वेबसाइट आहे- https://consumeraffairs.nic.in/en/consumer-corner/comparative-test-of-consumer-products-and-services

मला वाटतं, प्रत्येक आई मुलाच्या डब्यात ब्रेड बटर देण्याआधी कोणते बटर घ्यावे, याचा नक्कीच विचार करेल. त्याचप्रमाणे मॉलमध्ये गेल्यावर ग्राहक योग्य ते निकष लावून कोणते बटर विकत घ्यावे, याची डोळसपणे निवड करू शकतील.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -