Share

नितीन सप्रे

मदन मोहन रायबहाद्दूर चुन्नीलाल कोहली अशा भारदस्त नावाचा धनी म्हणजेच, आपणा सर्वांना सुपरिचित असलेला बॉलिवूडचा अनोन्य, तरल संगीतकार मदन मोहन. तो केवळ संगीतकारच नाही, तर संमोहनकारही होता. संगीतानं संमोहित करण्याची कला त्यानं हस्तगत केली होती. बहुआयामी प्रतिभेचा तो स्वामी होता. त्याच्या प्रतिभेचं वर्णन करण्यासाठी एका भाषेतील विशेषणं अपुरी आहेत. मदन मोहन यांच्या रचना आणि लतादीदींचे सूर म्हणजे, तर स्वरमाधूर्याच्या अदृष्य परांच्या सहाय्यानं, एखाद्या अज्ञात प्रदेशात, मुक्त विचारण करत, अपार परमानंदात हरपून जाण्यासारखे आहे.

‘लग जा गले के फिर ये’, ‘आप की नजरों ने समझा’, ‘बैंय्या ना धरो’, ‘मेरा साया साथ होगा’, ‘तुम जो मिल गये हो’, ‘हम प्यार मे जलनेवालों को’, ‘उनकी ये इनायत हैं की हम कुछ नहीं कहते’, ‘बदली से निकला हैं चांद’, ‘बैरन निंद न आए’, ‘तेरी आंखो के सिवा दुनिया में रखा क्या है (झिंझोटी)’, ‘मिलो ना तुमसे हम घबरायें’ यांसारखी एकाहून एक मोहमयी गीतं, ‘जरुरत हैं जरुरत हैं जरुरत हैं एक श्रीमती की’, यासारखं अवखळ गाणं, ‘ये माना मेरी जान मुहब्बत सजा हैं’ सारखी कव्वाली, ‘रस्मे उल्फत को निभाएँ’, ‘हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह’, ‘वो भूली दास्ताँ लो फिर याद आ गयी’, ‘बेताब दिल की’, ‘माई री मैं कासे कहँु पीर अपने जिया की’, ‘जो हमने दास्ताँ अपनी सुनाई(चारुकेशी)’, ‘तुम बिन जीवन कैसे बिता’, ‘अगर मुझसे मुहब्बत हैं’, ‘फिर वही शाम’, ‘मेरी याद मे तुम ना’, ‘भुली हुई यादों (यमन कल्याण)’, ‘जाना था हमसे दूर (पिलू धून)’…

ही यादी न संपणारी आहे. २५ जून १९२४ ला स्वर्गावतरण करून आलेला हा गंधर्व आपणासाठी अशा उत्कृष्ट गीतांचा अनुपम ठेवा ठेवून वयाच्या पन्नाशीत अचानक खट्टू मनानं १४ जुलै १९७५ला पुनश्च स्वर्गारोहण करता झाला. मात्र त्याच्या रचनांची मोहिनी आजही तिळमात्र कमी झालेली नाही.

मदन मोहन यांचा जन्म बगदादचा. वडील इराक पोलीस खात्यात अकाऊंट जनरल होते. पुढे ते चकवाल या त्यांच्या गावी परतले. लाहोरच्या शाळेत काही वर्षे त्यांचं शिक्षण झालं, त्यावेळी त्यांनी शास्त्रीय संगीताचं प्राथमिक ज्ञान मिळवलं, मात्र औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं. चित्रपट क्षेत्रात जाऊ नये म्हणून त्यांच्या आजोबांनी त्यांना डेहराडूनच्या लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत दाखल केलं. १९४२ ते १९४४ अशी दोन वर्षे ते लष्करात सेकंड लेफ्टनंट होते. दुसऱ्या महायुद्धातही ते सहभागी होते. युद्ध संपताच लष्कर सोडून आपलं पहिलं प्रेम संगीताच्या ते मागे गेले. त्यांनी आकाशवाणी लखनऊ आणि दिल्ली इथे नोकरी केली. मात्र मन रमलं नाही. अभिनय, गायनाचा ध्यास उरी बाळगून ते मायानगरी मुंबईत दाखल झाले. रणभूमीत बंदूकीच्या गोळ्या चालवणाऱ्या या सैनिकाच्या मायानगरीतल्या कामगिरीनं अनेकांची हृदये क़त्ल झाली. कामासाठी कुणाकडे याचना न करण्याचा बाणेदारपणा आणि स्वतःला रुचणारं उच्च अभिरुची असणारं संगीतच करायचं, तडजोड करायची नाही, असा गाणेदारपणा आजन्म बाळगला. संगीताच्या प्रेमाखातर त्यांनी अनेक हालअपेष्टा सोसल्या. त्यांना घरातूनही बाहेर करण्यात आलं. आठ-आठ दिवस उपाशी राहून रस्त्यावर झोपूनही आपली संगीत सृजनता जागृत ठेवली. अग्नीमध्ये तावून सुलावून निघाल्यावर सोन्यापासून दागिना घडतो. मदन मोहन असाच अलंकार होता.

हिंदी चित्रपट सृष्टीत ‘किंग ऑफ मेलडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संगीत दिग्दर्शकाची लतादीदींना पहिली पसंती असायची. मदन मोहनसाठी गाताना त्याही कांकणभर अधिक जीव ओतून गात असत, असं म्हणायला हरकत नाही. मोहम्मद रफी, मुकेश, किशोरदा आणि तलत महमूद यांनीही त्यांची गीतं, गझल अप्रतिम गाऊन चिरस्मरणीय करून ठेवली आहेत. राजा मेहंदी अली खान, राजेन्द्र कृष्ण आणि कैफ़ी आज़मी हे त्यांचे आवडते गीतकार. हिंदुस्तानी वाद्यवृंदाचा नेटका वापर, ठेक्याचं वजन, लक्षात राहतील असे प्रील्युड, इंटरल्युड, सतारीची साथ ही त्यांची मर्मस्थळं होती. पन्नास, साठ आणि सत्तरच्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट संगीत क्षत्रात अजोड कामगिरी करून ठेवली.

असं म्हणतात की, एखाद्याच्या मागे चकवा लागला की, तो तिथल्या तिथेच फिरत राहतो. त्याला पुढची वाट सापडत नाही. मदन मोहन यांच्या रचना रसिकांच्या मागे असाच चकवा लावतात. त्याची एकाहून एक सुरेल, सुरम्य गीतं ऐकणारे श्रोते त्या गीत उद्यानातच हरवून जातात. ‘आपके पेहलूं मे आकार रो दिये’ आणि ‘कभी ना कभी कोई ना कोई तो आयेगा’ ही स्वतःची गाणी त्यांच्या विशेष आवडीची होती. छोट्या समारंभात ही गाणी ते नेहमी गात असतं आणि वाहवाही करणाऱ्या त्या मैफलीला हे ठाऊकही नसे की आपल्या हृदयीचं शल्यचं ते गाऊन दाखवत आहेत. कारण असा अवलिया संगीतकार नेहमीच अपुरस्कृत राहिला. आपली प्रतिभा पुरस्कृत करणारा ‘कोई ना कोई तो आएगा’ हा आशावाद फोल ठरल्यानं, ‘पहलूं मे जाकर रोना’ हेच त्याच्या भाग्यात आलं. पुरस्कारांच्या बाबतीत चित्रपटसृष्टीनं इतकी अवहेलना केली की, पुरस्कारांचा त्यांना तिरस्कार वाटू लागला. फिल्मफेअर अॅवॉर्डने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. ‘वह कौन थी’ फिल्मसाठी त्यांना निश्चितच अॅवॉर्ड मिळेल असं वाटत असताना, तो त्यांना मिळाला नाही. लतादीदींनी खंत व्यक्त करताच ते म्हणाले होते, “तुम्हाला खंत वाटतेय ही गोष्ट अॅवॉर्डपेक्षा काय कमी आहे?” त्यांना जेव्हा ‘दस्तक’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा तो घेण्यासाठी त्यांना जायचंच नव्हतं. त्याच चित्रपटात अभिनयाचा पुरस्कार संजीवकुमार यांना मिळाला होता आणि त्यांनी मदन मोहन यांना त्यांच्यासमवेत येण्यास राजी केलं.

‘उपेक्षू नको गुणवंता अनंता’ हे मागणं मदन भैय्यांसाठी कुणी त्या रघूनायकाकडे मागितलंच नसावं. निदान डझनभर फिल्मफेअर मिळतील, अशी बावनकशी कामगिरी या गुणी संगीतकारांनी करून ठेवली आहे. संवेदनशील कलाकाराला अशी उपेक्षा जिव्हारी लागत असावी. मदन मोहन यांनीही ही गोष्ट प्रकृतीवर दुष्परिणाम होईल, एवढी मनाला लावून घेतली. वास्तविक या असल्या लौकिक पुरस्कारांनी एखादी कमनीय स्थूल/जड बाहुलीच फार फार तर हाती येते. त्यामुळे अमरत्व प्राप्त होतं असं नाही. ते तर अलौकिक पुरस्कारांचे हकदार होते आणि ते त्यांच्याकडे अापसूक चालून आले. असं सांगतात की, ‘मौसम’ या चित्रपटातल्या ‘दिल ढुंढता है’ या एकाच गाण्यासाठी मदनजींनी अनेक चाली केल्या होत्या. गिटारवादक भूपेंद्रच्या आवाजातलं वेगळेपण हेरून त्याला त्यांनी ब्रेक दिला. मदन मोहन यांचे गुरू सचिनदा ‘दिल ढुंढता है’ची सुरावट रात्रभर ऐकून बेचैन झाले आणि पहाटे पहाटे मदनमोहन यांच्या घरी गेले. त्यांचं कौतुक करण्यासाठी मुंबईतल्या खार ते पेडर रोड स्वतः गाडी चालवत आले.

खरं तर आपल्या सहाय्यकाच्या घरी जाऊन एस. डी. यांनी केलेलं हे कौतुक म्हणजे कृष्णानं सुदाम्याच्या घरी जाऊन सन्मान करण्यासारखंच आहे. “मदन मेरे भाई, ‘हैं इसिमे प्यार की आब्रू’, इस रचना पर मेरा सारा काम कुर्बान” अशा शब्दांत नौशाद यांनी मदन मोहन प्रति आपला आदर व्यक्त केला होता. नौशादसारख्या प्रथितयश संगीतकाराकडून अशी विलक्षण दाद मिळणं, हे कुठल्याही अन्य पुरस्कारापलीकडचं आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक उस्ताद आमिर खाँ हे त्यांचे प्रशंसक होते. ‘भाई भाई’ हा मदन मोहन यांचा बॉक्स ऑफिसवर हिट झालेला पहिला चित्रपट. यातलं ‘कदर जाने ना’ हे गीत प्रसिद्ध ठुमरी, गझल गायिका बेगम अख्तर यांना इतकं आवडलं की, त्यांनी मदन मोहन यांचे टेलिफोन करून खूप कौतुक केलं आणि टेलिफोनवरूनच त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा ऐकलं होतं. मदन मोहन यांच्या निधनाच्या समयी लतादीदी लंडन दौऱ्यावर होत्या. तो ट्रंक कॉल बुक करून बोलण्याचा जमाना होता. त्यामुळे ही बातमी त्यांना दोन दिवस कळलीच नाही. नंतर कुठून तरी कळल्यावर त्यांनी फोन करून लंडनहून मदन भय्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोहम्मद रफीही मिडल इस्टच्या दौऱ्यावरून परतत असताना मुंबई विमानतळावरच त्यांना ही बातमी कळली. ते तिथूनच थेट स्मशानभूमीत गेले. अग्नी देण्याच्या अगदी पाच मिनिटे पहिले तिथे पोहोचले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. याच संगीतकाराच्या सुरावटीवर हा महान गायक गायला होता…

“शाम जब आँसू बहाती आ गई
शाम जब आँसू बहाती आ गई
हर तरफ़ ग़म की उदासी छा गई
दीप यादों के जलाकर रो दिये
आपके पहलू में आकर रो दिये”

राजा मेहंदी अली खान यांचे शब्द असे यथार्थ व्हावेत, हा केवढा दैव-दुर्विलास! एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडत रडत रफींनी त्या महान संगीतकाराचं अंत्यदर्शन घेतलं. पन्नासच वर्षे जगलेल्या ह्या कलाकाराची गाणी तो इहलोकातून निघून गेल्याला पन्नास वर्ष होत आली तरी रसिकांच्या कानात, मनात ती जिवंत आहेत. १९६५ मध्ये लक्ष्मीकांत-प्यारेलाल (दोस्ती), शंकर-जयकिशन (संगम) आणि मदन मोहन(वह कौन थी) यांना बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून नामांकित करण्यात आलं होतं. ‘दोस्ती’नं बाजी मारली. आज फिल्मफेअर न मिळालेल्या ‘वह कौन थी’ चित्रपटातल्या ‘लग जा गले’ या रचनेला, यूट्यूबवर २०० मिलियनपेक्षा अधिक श्रोते (Hits) आहेत आणि सुमारे बारा हजारांपेक्षा जास्त व्हर्जन्स ऐकायला मिळतात. मदन मोहन हे कदाचित या धरातलावरचे एकमेव संगीतकार असतील की, त्यांच्या मृत्यूनंतर तीस वर्षांनी आलेली फिल्म ‘वीर झारा’ची गाणी प्रचंड गाजली. या चित्रपटाच्या श्रेय नामावलीत संगीत निर्देशक म्हणून मदनजींचं नाव झळकलं आहे. त्यांच्या मुलांनी, त्यांनीच करून ठेवलेल्या रचनांची पुनर्निर्मिती (recreate) केली होती. मदनजी रसिक तुम्हाला आश्वस्त करू इच्छितात, तुमच्या रचना कालजयी आहेत. यश, अमरत्व म्हणतात ते यालाच…

nitinnsapre@gmail.com

Recent Posts

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड! अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी जम्मू-काश्मीरकडे रवाना

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…

21 minutes ago

NEET Student Suicide : ‘परीक्षा आणि कुटुंब जबाबदार नाहीत’ चिठ्ठी लिहित १८ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास!

पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…

37 minutes ago

प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता – अजित पवार

मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…

49 minutes ago

Pahalgam Terror Attack : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून राजनाथ सिंहांचा इशारा

नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला…

52 minutes ago

Sanju Rathod Shaky Song : ‘गुलाबी साडी’ नंतर संजू राठोडचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : संजू राठोडने (Sanju Rathod) गायलेले 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं प्रचंड लोकप्रिय…

1 hour ago

Pahalgam Terror Attack: प्रविण तरडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, पहलगाम हल्ल्यात गमावला जीवलग मित्र

पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…

2 hours ago