नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत देशात २० हजार ३८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी २० हजार १३९ रुग्ण आणि ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. तुलनेने कोरोना रुग्ण संख्या काही अंकानी घटली असली, तरी वाढत्या मृत्यूच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
केंद्र सरकारकडून आजपासून ‘कोविड लस अमृत महोत्सव’ अंतर्गत पुढचे ७५ दिवस बूस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर ३० सप्टेंबरपर्यंत मोफत डोस मिळणार आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली असून याच निमित्तानं देशात ७५ दिवसांसाठी ‘कोविड लस अमृत महोत्सव’ राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा, हाच त्यामागील मुख्य हेतू आहे.