नवी दिल्ली (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी १६ जुलै रोजी उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या हस्ते, जालौन जिल्ह्यातील उरईमधील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते २९ फेब्रुवारी २०२० रोजी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या कामाची कोनशीला रचणे हा या दिशेने केलेला महत्त्वाचा प्रयत्न होता. या द्रुतगती महामार्गाचे काम २८ महिन्यात पूर्ण झाले असून आता त्याचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
यूपीईआयडीए अर्थात उत्तर प्रदेश द्रुतगती महामार्ग औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या देखरेखीखाली सुमारे १४,८५० कोटी रुपये खर्चाच्या या चौपदरी २९६ किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गाची उभारणी करण्यात आली. पुढील काळात या महामार्गाचा विस्तार करून हा मार्ग सहापदरी देखील करता येऊ शकेल. हा द्रुतगती महामार्ग चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूपजवळील गोंडा गावातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५ पासून इटावा जिल्ह्यातील कुद्रैल गावापर्यंत आहे आणि या गावाजवळ हा महामार्ग आग्रा-लखनौ द्रुतगती महामार्गाला जाऊन मिळतो. हा द्रुतगती महामार्ग चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपुर, जालौन, ऑरैय्या आणि इटावा या सात जिल्ह्यांमधून जातो.
या परिसरातील दळणवळण सुविधा सुधारण्यासोबतच, बुंदेलखंड द्रुतगती महामार्ग येथील आर्थिक विकासाला देखील मोठी चालना देणारा ठरेल आणि त्यातून स्थानिक लोकांसाठी हजारो रोजगार निर्माण होतील. बांदा आणि जालौन जिल्ह्यांमध्ये बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाशेजारील परिसरात औद्योगिक कॉरीडॉर निर्मितीचे काम यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे.