Monday, January 13, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यकोकण वर्षा पर्यटन आणि रानभाज्या

कोकण वर्षा पर्यटन आणि रानभाज्या

संतोष वायंगणकर

कोकण म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेलं स्वप्न असा उल्लेख साहित्यिक करतात. ते कोकण खरंच खूप सुंदर आहे. सृष्टीसौंदर्याची आरास आहे. डोंगरदऱ्या, हिरवी झाडी, झुडप असे डोळ्यांत साठवून ठेवावे इतकं सौंदर्य आहे. हिवाळ्यात कोकण धुक्यात हरवते. पावसाळा सुरू झाला की, हिरव्या शालूने पांघरलेल्या सौंदर्यात कोकणचे कोकणपण अधिकच खुलून दिसतं. पावसाळा सुरू झाला की, कोकणातील डोंगरदऱ्यांतून खळाळणारे झरे आणि डोंगर उतारावरून पाण्याचा अभिषेक सुरू आहे.

असा आभास व्हावा असे भासणारे उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याचे धबधबे, कोकणात येणाऱ्या कुणाही पर्यटकाला या धबधब्यांचं फार आकर्षण आहे. कोकणात धबधब्यांचं सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटनस्थळं आहेत. काही विकसित झालेली आहेत. तर काही पर्यटनस्थळं विकासापासून दूरच आहेत. कोकणातील सर्वच पर्यटनस्थळ जर निटपणाने विकसित करण्यात आली तर निश्चितपणे येणाऱ्या पर्यटकांनाही त्याचा आनंद घेता येऊ शकतो. कोकणात वर्षा पर्यंटनही मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. वर्षा पर्यटन हे केवळ धबधब्यांपुरते मर्यादित राहता कामा नये. त्यासाठी जी सृष्टीसौंदर्याने नटलेली कोकणातील सौंदर्यस्थळ आहेत, ती दाखवली गेली पाहिजेत. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याचे अनेक उपाय, मार्ग आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होणाराही फार मोठा पर्यटकांचा एक वर्ग आहे. कोकणातील रानात निर्माण होणाऱ्या अनेक रानभाज्या या पावसाळी हंगामात येतात. या रानभाज्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहेत. आज-काल हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांसाठी रानभाज्या उपयुक्तच ठरत असतात. कोकणातील रानभाज्या या पौष्टिक आहेत. पूर्वी शेतकरी व ग्रामीण भागातील सर्वच लोक हे या रानभाज्यांवर पावसाळी हंगाम काढायचे. आज काळ बदलला आहे. आयुर्वेदाचा उपयोग समाजात वाढला आहे. नैसर्गिक असलेल्या वस्तूंचा वापर खाण्यामध्ये केला जातोय. दहा वर्षांपूर्वी गुळाचा चहा म्हणून नाक मुरडणारे आता आवर्जून गुळाचा चहा पितात. विशेष म्हणजे गुळाचा चहा विक्री करणारे खास चहा स्टॉल जागोजागी उभे असलेले दिसतात. पर्यटन व्यवसायाचा विचार करताना बदललेल्या खाद्यसंस्कृतींचा विचार करून जर पर्यटन व्यवसायातही या बदललेल्या खाद्यसंस्कृती विचार केला गेला, तर निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम व्यवसायात झालेला दिसेल. कोकणातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात येतच आहेत; परंतु त्यातही आणखी वाढ होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी या सगळ्यामध्ये येणाऱ्या अनेक संकटातून पर्यटन व्यवसायच कोकणाला बाहेर काढू शकेल. कोकणातील पर्यटनाच्या बाबतीत ऋतुमानानुसार या व्यवसायातील बदलाचा विचार केला पाहिजे. त्याच नीट मार्केटिंग करायला जमले पाहिजे. महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीच मार्केटिंग केलं आहे. महाबळेश्वर आणि कोकण यात काही फरक नाही; परंतु पर्यटन स्थळांवर पर्यटकांना आवश्यक सुविधा त्यांना पर्यटनस्थळांवर रेंगाळता येईल, अशी खाद्यपदार्थांची रेलचेल असायला पाहिजे. आपण वडापाव, आंबोळी, घावणे-चटणी यामध्येच जर अडकून पडलो तर आपण पर्यटन व्यवसायात प्रगती करू शकणार नाही. गेल्या काही वर्षांत वर्षा ऋतूतही पर्यटक आपणाकडे येत आहेत. पर्यटकांच्या कोकणात येण्याचे प्रमाणही फार मोठे आहे.

अनेक सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिरावण्याची संधी या पर्यटन व्यवसायातून होते. कोणत्याही व्यवसायात विश्वासार्हता महत्त्वाची असते ती तशी विश्वासार्हता या पर्यटन व्यवसायातही व्यावसायिकांनी सांभाळणे आवश्यक आहे. विश्वासघातावर जग चालत नाही. तर विश्वासार्हतेवरच जगाची वाटचाल सुरू आहे हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. कुणाला जरी वाटलं की फसवा-फसवीतून लगेच श्रीमंत, मोठे होता येते; परंतु हे सारं क्षणिक असतं. पर्यटक आपल्याकडे पुन्हा पुन्हा यायला पाहिजे असतील, तर त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. त्यांना तितकीच चांगली दर्जेदार आणि आपुलकीची सेवा दिली पाहिजे. येणाऱ्या पर्यटकांवर आपण उपकार करत नाही. त्यांना देणाऱ्या सेवा-सुविधांचे आपण पैसे घेतो हे समजून घेतले पाहिजे. येणारा पर्यटक कोकणात अनेक पर्यटनस्थळांवर गेला पाहिजे यासाठी या पर्यटन व्यवसायात असणाऱ्या सर्वांनीच कोकणात अन्य ठिकाणीही अनेक पाहण्यासारखी सौंदर्यवान पर्यटनस्थळ आहेत हे सांगितले पाहिजे.

पर्यटन व्यवसाय आपोआपच एक व्यावसायिक साखळी निर्माण झाली पाहिजे. सर्वच ऋतूत कोकणात पर्यटनस्थळांवर जायला पाहिजे हे पर्यटकांना वाटलं आणि पटलं पाहिजे. एप्रिल-मेमध्ये उष्णता असते मात्र तरीही या हंगामात कोकणात आंबे, काजू, कोकम, जांभूळ, करवंद यांचा आस्वाद घेत संध्याकाळी कोकणातील स्वच्छ, सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर भटकंती करता येते. यासाठी काही पर्यटक येत असले तरीही त्यांची संख्या वाढली पाहिजे. वर्षा पर्यटकांची संख्या आणखी कशी वाढेल याचं मार्केटिंग आपणच करायला पाहिजे. रानभाज्या आरोग्यासाठी कशा उपयुक्त आहेत त्या कोकणात कशा मिळतात. याचेही एक वेगळं मार्केटिंग या पर्यटन व्यवसायात केलं पाहिजे. शासन काय करायचं ते शासकीयस्तरावर केलं जाईल; परंतु पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी आपणालाच मार्केटिंग करून या व्यवसायातून कोकणला आर्थिक सक्षम होता येईल.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -