नाशिक (प्रतिनिधी) : मुंबई-नाशिक दरम्यानचा प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी खा. गोडसे यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबई ते नाशिक दरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना अडचणींचा ठरणाऱ्या इगतपुरी-कसारा दरम्यानच्या लोहमार्गावर १:१०० ग्रेडीयंट क्षमतेचा टनेल व्हावा यासाठीच्या प्रस्तावास रेल्वे बोर्डाने जागा सर्वेक्षणाला अंतिम मान्यता दिली असून याकामी ६४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
इगतपुरी – कसारा हे अंतर १६ कि.मी.चे असून या दरम्यान १ : १०० ग्रेडीयंटचा टनेल झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि बॅकरवर होणारा खर्चही वाचणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मध्य रेल्वे मार्गावरून ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांची आणि प्रवाशांची संख्या मोठी आहे. या सर्व रेल्वेगाड्यांना इगतपुरी ते कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावरूनच धावावे लागते. इगतपुरी ते कसारा हे १६ कि.मीचे अंतर असून या दरम्यानच्या घाट परिसरांत पूर्वीपासून असलेले टनेल कमी व्यासाचे आहेत. परिणामी या दरम्यानच्या घाट परिसरात सतत रेल्वेगाड्या थांबवाव्या लागत असल्याने प्रवासास विलंब होतो. कसारा-इगतपुरी दरम्यान १.३७ एेवजी १.१०० ग्रेडीयंट क्षमतेच्या मध्ये टनेल व्हावा, अशी मागणी खा. गोडसे केंद्राकडे करत होते. टनेल उभारणी झाल्यावर मुंबईहून कसाऱ्यापर्यंत धावणारी लोकल नाशिकपर्यंत धावणे शक्य होणार आहे.