नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये मंकीपॉक्सच्या संशयास्पद रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. आरोग्य सचिवांनी संशयित रुग्ण आढळून येत असलेल्या ठिकाणी आरोग्य तपासणी पथकं, रोगनिरीक्षण पथकं, रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना सामान्य लक्षणांबद्दल सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
परदेशातून येणा-या लोकांवर सतत मांकीपॉक्ससाठी लक्ष ठेवले जाते आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशपासून केरळपर्यंत काही लोकांमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे दिसून आली होती. मात्र सुदैवाने भारतात अद्याप त्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले की, रुग्णाचे नमुने गोळा करण्यात आले असून ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा संसर्गजन्य रोग आहे आणि त्याची लक्षणे कांजन्याच्या रुग्णांसारखीच असतात.
जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच म्हटले की, मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या संख्येत आठवडाभरात ७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांची संख्या सहा हजारापेक्षा जास्त झाली आहे. तर आफ्रिकेच्या काही भागात या विषाणूमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे युरोप आणि आफ्रिकेत आढळून आली आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य एजन्सीने सांगितले की, मंकीपॉक्स हा गूढ रोग प्रामुख्याने पुरुषांनी पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवलेल्या पुरुषांना प्रभावित करतो.