Tuesday, June 17, 2025

खेडमध्ये पुरात अडकलेल्या पाच गुरांची एनडीआरएफकडून सुटका

खेडमध्ये पुरात अडकलेल्या पाच गुरांची एनडीआरएफकडून सुटका

रत्नागिरी (हिं. स.) : खेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून धोका पातळी ओलांडली आहे. खेडच्या देवणे भागात पुरात अडकलेल्या पाच गुरांची एनडीआरएफच्या पथकाने सुटका केली. पुरामुळे चार गाई आणि एक वासरू गोठ्यात अडकून पडले होते.


गेल्या तीन दिवसांपासून खेड तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. आणखी दोन-तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. तसेच अतिवृष्टीमुळे खेड शहरात पाणी भरण्याची शक्यता असल्याने शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी आपले महत्त्वाचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.


खेड तालुक्यात रात्रभर पावसाचा जोर कायम असल्याने जगबुडी नदी धोकादायक पातळीवरून वाहत आहे. खेड शहरात अद्याप पाणी आलेले नाही. मात्र जगबुडी नदीकाठच्या सुमारे पंचवीस ते तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये अलसुरे, निळीक, भोस्ते, शिव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे. वेरळ आणि सुकिवली येथील वाड्यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांत जगबुडी नदीने अनेकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. आज सकाळपासून जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून म्हणजेच ७.२० मीटरवरन वाहत आहे. जगबुडी नदीची ७ मीटर ही धोकादायक पातळी आहे. दापोली-खेड मार्गावर पाणी आले नसले तरी पावसाचा जोर कायम राहिला तर हा मार्ग कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतो. मुंबई–गोवा महामार्गावरील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला आहे. तिथपर्यंत पाणी पोहोचलेले नाही.


खेड पालिका हद्दीत नदीकाठी झोपडपट्टी आहे. तेथील ३७ कुटुंबांना गेल्या आठवड्यात सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत पथकाचे १८ जवान खेडमध्ये दाखल झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >