मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा आज दुपारी ०१.०४ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
मोडक-सागर तलाव गेल्यावर्षी म्हणजेच सन २०२१ मध्ये २२ जुलै २०२१ रोजी मध्यरात्री ०३.२४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी म्हणजेच सन २०२० मध्ये १८ ऑगस्ट रोजी रात्री ०९.२४ वाजता, वर्ष २०१९ मध्ये २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन २०१८ व २०१७ असे दोन्ही वर्ष हा तलाव १५ जुलै रोजी आणि सन २०१६ मध्ये ०१ ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता. या सर्व आधीच्या वर्षांच्या तारखा लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात हा तलाव यापूर्वीच्या नोंदींच्या तुलनेत काही दिवस आधीच पूर्ण भरुन वाहू लागला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून यामध्ये आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार ८११५२.२० कोटी लीटर (८,११,५२२ दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ५६.०७ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.
याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ४३.७२ टक्के अर्थात ९९२६.८० कोटी लीटर (९९,२६८ दशलक्ष लीटर), मोडक-सागर तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी असून आज हा तलाव १०० टक्के भरलेला आहे. तर तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ६६.७९ टक्के अर्थात ९६८९.४० कोटी लीटर (९६,८९४ दशलक्ष लीटर), ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या ५३.९० टक्के अर्थात १०४३२.२० कोटी लीटर (१,०४,३२२ दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ५१.०६ टक्के अर्थात ३६६११.३० कोटी लीटर (३,६६,११३ दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ५३.१८ टक्के अर्थात १४७३ कोटी लीटर (१४,७३० दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्ये देखील पाणी साठवण क्षमतेच्या ७६.०८ टक्के अर्थात ६१२.१० कोटी लीटर (६,१२१ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.