Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यवेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता... सामाजिक गरज

वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता… सामाजिक गरज

मीनाक्षी जगदाळे

काही दिवसांपूर्वी न्यायालयाने वेश्या व्यावसायिक म्हणजेच सेक्स वर्कर या व्यवसाय पद्धतीला कायदेशीर मान्यता दिली. समाजातील विविध घटकांनी यावर वेगवेगळे अभिप्राय, मत, विचार मांडले. कोणी या निर्णयाचे स्वागत केले तर कोणाला हा निर्णय पचवणे अवघड गेले. आपल्या समाजात सेक्स या विषयावर उघडपणे बोलणं देखील चुकीचे समजले जाते, तर तो एक व्यवसाय म्हणून स्वीकारला जाणे सर्वसामान्य मानसिकतेसाठी खरंच अवघड आहे. स्त्री-पुरुषांमधील शारीरिक संबंध. खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यातील दैनंदिन गरज; परंतु त्याचा प्रचंड बाऊ करून, त्याविषयी न बोलून, स्वतःचा कोंडमारा करून, समोरच्याचे मन मारून, नैतिकता, सभ्यता आणि संस्कार या स्वतःच्या आणि सामाजाच्या दृष्टीने सोयीस्कर संकल्पनेखाली गाडलेला प्रत्येक तळमळणारा जीव.

समाजाची हीच खरी गरज ओळखून ज्या कायद्याने सज्ञान महिला देहविक्रीचा व्यवसाय स्वखुशीने, स्वतःच्या मनाने आणि कोणाच्याही कोणत्याही दबावाला बळी न पडता करत असतात. त्यांना आपलाच समाज नावे ठेवतो, त्यांना चुकीच्या दृष्टीने बघतो आणि त्यांच्यापासून कायमच लांब राहतो. अशा सेक्स वर्कर महिलांकडे समाजातील सर्वसामान्य घरातील स्त्रिया तर अतिशय चुकीच्या दृष्टिकोनातून बघतात; परंतु आपण सर्वांनीच हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, अनेक महिला गरजेपोटी, उदरनिर्वाह करण्यासाठी, उत्पन्नाचे पर्यायी कोणतेही साधन नसल्याने, घरातून कोणताही आधार नसल्याने हा व्यवसाय नाईलाजाने स्वीकारतात, तर खूप कमी महिला स्वतःच्या इच्छेने हा व्यवसाय करीत असतात.

समाजातील जे पुरुष घटक कोणत्याही कारणास्तव स्त्रीपासून मिळणाऱ्या शारीरिक सुखापासून वंचित आहेत. त्यांची गरज या व्यवसायामार्फत भागविली जाते. त्यामुळेच हा व्यवसाय देखील एक सामाजिक गरज आहे, हे मान्य करायला हरकत नाही. समाजातील गरजवंत असलेला पुरुष वर्ग सेक्स वर्कर महिलेला रोजगार मिळवून देत असून त्यातून या महिला उदरनिर्वाह करीत आहेत, त्यांना कुटुंब अथवा मुलंबाळं असल्यास त्यांचं पालनपोषण करीत आहेत. त्यांच्या दैनंदिन गरजा भगवल्या जात असून त्यांना निदान मूलभूत गरजा भागवणे सोपे होत आहे. तसेच या व्यवसायात असणाऱ्या महिला निदान आत्महत्या करून जीवन संपवण्यापेक्षा त्यांना आर्थिक आधार मिळून त्या आत्महत्यापासून परावृत्त होत आहेत.

आज-काल आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात मानसिक आजार वाढीस लागत आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजेच शारीरिक सुखाबाबत होणारा कोंडमारा, त्या संदर्भातील सर्व भावभावना मनात दाबून ठेवण्याची प्रवृत्ती, उघडपणे या विषयावर संवाद साधण्याची मोकळीक नं मिळणं, या भावना आणि गरजा कुठेही बोलून दाखवता न येणं, या गरजा अपेक्षित पद्धतीने पूर्ण न होणे, समाजाची भीती, दबाव आणि त्यातून येणारा एकाकीपणा, नैराश्य, मानसिक ताण-तणाव आणि आजार तसेच मानसिक, शारीरिक विकृती याला आमंत्रण देतात.

समलिंगी संबंध, वयस्कर पुरुषांनी लहान मुलींवर केलेली जबरदस्ती, सामुदायिक बलात्कार, त्यातून अनैसर्गिक संबंध, जीवे मारण्याची धमकी, सामाजिक माध्यमातून चुकीचे व्हीडिओ फोटो पाहणे, ते अमलात आणण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, त्यातून ब्लॅकमेलिंग यांसारखे प्रकार याच विकृतीमधून उदयाला येतात. कुटुंबातील लहान बालक, बालिका देखील शारीरिक अत्याचाराला बळी पडत आहेत. कारण अत्याचार करणारा स्वतःच्या नैसर्गिक गरजा योग्य त्या माध्यमातून पूर्ण करू शकतं नाही, त्याला पर्याय उपलब्ध नाही अथवा भीतीपोटी तो त्या मार्गाला जात नाही आणि घरातील महिला बालक त्याच्या या मानसिकतेला बळी पडतात. मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने शारीरिक गरजा पूर्ण होणे देखील अनिवार्य आहे, यासाठी सेक्स वर्कर महिलांचे योगदान विचारात घेणे आवश्यक आहे.असेही आपल्या आजूबाजूच्या समाजातील अनेक जण अनैतिक, विवाहबाह्य संबंध प्रस्तापित करून स्वतःच्या गरजा बिनदिक्कत भागवताना दिसतात. वैवाहिक आयुष्य जगत असतानासुद्धा ठेवल्या गेलेल्या विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक संसार, अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसतात. असे संबंध समोर आले, समजले की त्यातून घातपात, खून, आत्महत्या यांसारख्या गुन्हेगारी घटनांना चालना मिळते. समाजाला, कुटुंबाला चोरून, लपवून जर ही गरज भगवण्याचा खटाटोप केलाच जातो आहे आणि सभ्यतेच्या नावाखाली या प्रवृत्तीवर पांघरून घातलं जात आहेच. ज्या महिला उघडपणे या गरजा भागवण्यासाठी पुढाकार घेत असतील, व्यवसाय म्हणून हा मार्ग स्वीकारताना दिसत असतील, तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला हरकत नाही, असे वाटते.

अनेक देशांनी वेश्या व्यवसाय हा मान्यताप्राप्त, अधिकृत व्यवसाय म्हणून स्वीकारलेला असून, त्यामार्फत अनेक युवक युवतींना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिलेले आहे. अनेक देशांमध्ये हा व्यवसाय उघड उघड सुरु असल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटन वाढीस लागून त्यातून देखील उत्पनाचे साधन निर्माण झालेले आहे आणि अशा देशांनी स्वतःची आर्थिक प्रगती साधली आहे.

आपल्या देशात देखील मोठमोठ्या शहरामध्ये, मोठ्या हॉटेल्समध्ये, पर्यटन स्थळांवर प्रचंड प्रमाणावर पैसा सेक्स वर्करवर खर्च केला जातो. अनेक ठिकाणी परवानगीनुसार, तर अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे या व्यवसायात महिला सक्रिय आहेत. एखाद्या गल्लीबोळातील छोट्या घरात जाणाऱ्यांपासून ते मोठ्या स्टार हॉटेलपर्यंत जाणारा ग्राहक वर्ग आपल्या देशातसुद्धा आहेच. आपापल्या आर्थिक कुवतीनुसार, इच्छेनुसार आणि गरजेनुसार आणि सोईनुसार अनेक जण या विश्वात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रमलेले आहेतच.

आपल्यातील अनेक जण अशा ठिकाणी जाऊन चोरून लपून मौजमजा करतात, सर्व सुख उपभोगतात; परंतु त्यानंतर चारचौघांत मात्र हे सगळं कसं निंदनीय आहे. आपल्या संस्कारात, संस्कृतीमध्ये हे नाही बसत, हे चुकीचे आहे यावर चर्चा करतात. आपल्या सभ्यतेला, सामाजिक प्रतिष्ठेला कोणताही डाग लागणार नाही, आपली कुठेही बदनामी होणार नाही याची सर्व पूर्वकाळजी करुन जर सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यातील कमतरता भरून काढतो आहे तर फक्त त्या महिलांना बदनाम करण्यात काय अर्थ आहे.

अपेक्षित इतकंच आहे की हा व्यवसाय करणाऱ्यांनी अथवा करवून घेणाऱ्यांनी कोणालाही यामध्ये येण्याची जबरदस्ती करणे, फसवणूक करुन या व्यवसायात ओढणे, त्यासाठी मानवी तस्करी करणे, गरीब घरातील मुलींची मनाविरुद्ध खरेदी विक्री करणे, अपहरण करणे, दमदाटी, धमक्या देऊन यात सामील होण्यासाठी प्रवृत्त करणे, सर्वसामान्य रहिवाशी नागरिकांना त्रास होईल अशी वर्तवणूक करणे अशी कोणतीही कृत्य करु नयेत.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -