Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्र

चंद्रपूरामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील ३५ प्रवाशांची पोलिसांनी केली सुखरुप सुटका

चंद्रपूरामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील ३५ प्रवाशांची पोलिसांनी केली सुखरुप सुटका

चंद्रपूर (हिं.स.) : चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्यातील पथकाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवत धाडसाची कामगिरी केली आहे. राजुरा तालुक्यातील चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या खाजगी बसमधील ३५ प्रवाशांची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. शॉर्टकट घेण्याच्या नादात ही बस पुराच्या पाण्यात अडकली होती.

मध्यप्रदेशातून निघालेली ही ट्रॅव्हल्स बस शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस चालकाने बस पुढे नेली. त्यानंतर सकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडली आणि ३५ प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला.

परिसरातील लोकांनी याची माहिती तात्काळ विरुर पोलिसांना दिली. विरुर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच बचाव अभियान सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून वृद्ध-लहान मुले आणि महिला यांना बाहेर काढले. या सर्वांना दुसऱ्या एका बसमध्ये बसवून हैदराबादकडे रवाना केले. बस पुराच्या पाण्यात अजूनही अडकून पडलेली आहे.

Comments
Add Comment