सोलापूर : पंढरपूर मधील आषाढी यात्रा संपल्यानंतर आता पालिका प्रशासनासमोर कचरा उचलण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या परिसरात शेकडो टन कचरा पडला आहे. पावसामुळे साथीच्या आजाराची भीती बळावली आहे. सध्या तरी पालिकेच्या आरोग्य विभागाने युद्धपातळीवर स्वच्छता आणि साफसफाई मोहीम राबवत कचरा उचलण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र कचऱ्याचे प्रमाण खूपच असल्याने आणखी काही दिवस शहरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा आषाढी एकादशीसाठी सुमारे १५ लाख भाविक आले होते. गेल्या काही वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी प्रथमच झाली होती. या सोहळ्यासाठी आलेले लाखो भाविक सोमवारी, मंगळवारी परतले असले तरी त्यांच्यामुळे लागलेल्या कचऱ्याचे ढिगारे शहरातील नागरिकांच्या आरोग्यासमोर आव्हान बनले आहे. प्रचंड प्रमाणात पडलेला कचरा आणि त्यात भर म्हणजे दिवसभर अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस, ढगाळ, कोंदट वातावरण यामुळे दुर्गंधी वाढीस लागली आहे. शहरातील प्रमुख मार्ग, मंदिरे आणि मठांच्या परिसरात पडलेली खराब फळे, अन्नपदार्थ, कागदे, प्लास्टिक कचरा, या भागात झालेला कचरा, उघड्यावर शौच केल्याने निर्माण झालेली दुर्गंधी, चिखल व खड्यात साठलेले पाणी अशा भीषण परिस्थितीमुळे या भागात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. याप्रकारची लक्षणेही दिसू लागली आहेत.