Saturday, July 20, 2024
Homeमहामुंबईमुंबईत साथीच्या आजारांचे थैमान

मुंबईत साथीच्या आजारांचे थैमान

गॅस्ट्रो, मलेरियासह लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ

सीमा दाते

मुंबई : मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजारांनी मात्र थैमान घातले आहे. मुंबईत सध्या गॅस्ट्रो, मलेरिया आणि लेप्टोची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांवरील रुग्णांना नियंत्रणात आणण्याचे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे.

दरवर्षी मुंबई पावसाळ्यापूर्वी साथीचे आजार होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते, विविध उपाययोजना केल्या जातात. यंदाही पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या असल्या तरी सध्या मुंबईत गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या केवळ १० दिवसांत लेप्टोचे ५ रुग्ण आढळले आहेत. यामुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्याच्या १० दिवसांतच मलेरियाचे ११९ तर गॅस्ट्रोचे १७६ रुग्ण आढळले आहेत. केवळ १० दिवसांत एवढे रुग्ण आढळल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. जूनच्या संपूर्ण महिन्यात मलेरियाचे ३५० आणि गॅस्ट्रोचे ५४३ रुग्ण आढळले होते. त्यातच महिनाभरात लेप्टोचे १२ रुग्ण होते तर आता केवळ १० दिवसांत ५ रुग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ डेंग्यूचे १९ तर हेपटायटीसचे २३ रुग्ण आढळले आहेत.

विशेष म्हणजे सध्या पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात लेप्टोचा प्रसार वेगाने होत असतो. यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्यास पालिकेकडून सांगितले आहे. साचलेल्या पाण्यात जाऊ नये, ताप आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे असे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून ३,४४,२९१ घरांतील सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. यावेळी साचलेल्या पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -