Saturday, May 10, 2025

विदेश

श्रीलंकेत आणीबाणी; रानील विक्रमसिंघेंची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

श्रीलंकेत आणीबाणी; रानील विक्रमसिंघेंची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

कोलंबो (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रानील विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेमध्ये आर्थिक संकटामुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चालल्याचे दिसू लागले आहे.


एकीकडे आर्थिक संकटामुळे जनतेचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे राजकीय पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून या संकटावर उपाय शोधण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे जनता अधिकाधिक आक्रमक होत असताना श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशाबाहेर पलायन केले आहे. ते मालदीवमध्ये गेले असून तिथून दुबईला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई, परकीय गंगाजळीचा आटत चाललेला साठा आणि रोजच्या आहारासाठी देखील रस्त्यावर उतरण्याची नागरिकांवर आलेली वेळ या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचा रोष आणि आर्थिक आरिष्ट या पार्श्वभूमीवर चिघळलेली परिस्थिती पाहता गोटाबाया राजपक्षे १३ जुलै रोजी आपल्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी आपला राजीनामा अद्यापही दिला नाही. त्यापूर्वीच त्यांनी देशातून पलायन केले आहे.

Comments
Add Comment